पुणे, 6 ऑक्टोबर, (हिं.स) आज तुम्हाला पदवी प्राप्त झाली आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून व्यवसायिक जगतामध्ये वाटचाल सुरू होत आहे. अशावेळी तुम्हाला अनेक प्रश्न अडचणी समस्या येतील या समस्यांवर तुम्ही कशी मात करता आणि उत्तर शोधता त्यावरच तुमचे यश अवलंबून आहे. हे यश खात्रीशीर असेल. कारण खोलवर अभ्यास करून तुम्ही अडचणींना सामोरे जाता आणि यश संपादन करता त्यामुळे अडचणी, समस्यांना, प्रश्नांना शांतपणे विचारपूर्वक सामोरे जा, असा कानमंत्र कोरोमंडल इंटरनॅशनलचे पश्चिम विभाग सहयोगी उपाध्यक्ष जितेंद्र कोळपे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना दिला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पुणे बिझनेस स्कूलचा पहिला पदवीप्रदान समारंभ नुकताच जल्लोषात झाला. हनिवेल इंटरनॅशनलचे कॅप्टन रमण रैना, मनुष्यबळ विकास सल्लागार मिलिंद मुतालिक, कोरोमंडल फर्टिलायझर्सचे विजय कुमार यादव, दीपिका गहलोत, आयईईई डॉ. मुकुल सुतवणे, कोरोमंडल इंटरनॅशनलचे विभागीय व्यवस्थापक इस्माईल मोहम्मद, अनिल कश्यप, पीसीईटीच्या उपाध्यक्ष पद्मा भोसले, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, पुणे बिजनेस स्कूलचे प्राचार्य डॉ. गणेश राव, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी त्यागी आदी उपस्थित होते.
यावेळी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, विविध स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना ॲकॅडमिक अवार्ड, पीबीएस सुपरस्टार अवार्ड, पीबीएस रायझिंग स्टार अवार्ड देऊन गौरव करण्यात आला.कोळपे म्हणाले की, कृषी क्षेत्रातील उत्पादनात वाढ होत आहे. कृषी बँकिंग, कृषी अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता, विपणन साखळी, डिजिटल तंत्रज्ञान यामध्ये अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या संधीचा फायदा घेण्यासाठी कठोर परिश्रम केले की यश नक्कीच मिळेल.
हर्षवर्धन पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, पुणे बिझनेस स्कूल मधून पदवी प्राप्त करून आयुष्याच्या पुढील वाटचालीस प्रारंभ करीत आहात. आयुष्यात अडचणी आल्या शिवाय कोणीही यशस्वी होऊ शकला नाही; हे सत्य आहे. त्यामुळे नकारात्मक नाही तर सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन ठेवून कार्य करत रहा. पीबीएसचे प्राध्यापक आणि संस्था मार्गदर्शन करण्यासाठी सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहे असे पाटील यांनी सांगितले.
भारताचा अमृत काळ सुरू आहे. देशाची विकासाची वाटचाल पाहता २०५० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थाचा जागतिक पातळीवर मोठा विस्तार झालेला दिसेल. यापुढील काळात रोजगार, स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांनी नवीन कौशल्य आत्मसात केले पाहिजे. अपयशाची भीती मनातून काढून टाका, अडचणींना सामोरे जा; यश आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे, असे कॅप्टन रमण रैना यांनी सांगितले. आपली क्षमता ओळखून काम करत रहा. आपले वरिष्ठ, सहकारी यांच्यातील चांगल्या गोष्टी आत्मसात करा. मोठं उद्दिष्ट ठेऊन कार्य करा. दृष्टिकोन बदलला की विचारांत सकारात्मक बदल होऊन तुमची वाटचाल यशोशिखराकडे सुरू होते, असे डॉ. पंडित विद्यासागर यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
