बंगळुरू, 8 ऑक्टोबर : गेल्या 9 वर्षांत भारत हे एक किफायतशीर वैद्यकीय उपचारांचे ठिकाण बनले आहे. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून केलेल्या अनेक पथदर्शी आरोग्य सेवाविषयक सुधारणा आणि सक्षम तरतुदींमुळे हे शक्य झाले आहे, असे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
बंगळुरू येथील रामय्या वैद्यकीय महाविद्यालयात नॅशनल अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस (इंडिया), एनएएमएस च्या 63 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला संबोधित करत होते. रुग्णसेवेच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि उपलब्ध अत्याधुनिक निदान आणि उपचार पद्धतींचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम आणि इतर नवीन तंत्रज्ञानासह वैद्यकीय कौशल्य वाढवण्याचा प्रस्ताव सुचवला आहे.
विशेषत: तरुण व्यावसायिकांमध्ये नियमितपणे कौशल्य विकासावर भर देत, प्रसिद्ध मधुमेह तज्ञ आणि वैद्यकीय शाखेचे प्राध्यापक असलेले डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रतिबंधात्मक आणि एकात्मिक आरोग्य सेवेमध्ये अग्रेसर राहिला आहे. देशातील सर्व नागरिकांना प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा देण्यासाठी एनएएमएस सारख्या व्यावसायिक वैद्यकीय संस्था आणि सरकार एकत्र येऊ शकतात असे ते म्हणाले.
लोकांचे आयुर्मान वाढल्यामुळे अमृत काळात भारताला दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागेल. 70% पेक्षा जास्त लोकसंख्या 40 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. एकीकडे भारतात युवा लोकसंख्येची मोठी टक्केवारी आहे आणि दुसरीकडे आपल्याकडे वृद्धांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रोगांचा प्रसार रोखण्याचे तसेच वयोमानानुसार मर्यादित होणाऱ्या क्षमतांवर देखील लक्ष ठेवण्याचे दुहेरी आव्हान आपल्यासमोर आहे, असे ते म्हणाले.
