सोलापूर 8 ऑक्टोबर : उजनी धरणात सद्य:स्थितीत एकूण पाणीसाठा ९५ टीएमसी असून त्यात उपयुक्त साठा ३२ टीएमसीपर्यंतच (५९ टक्के) आहे. दरवर्षी उन्हाळा संपेपर्यंत सोलापूर शहरासाठी तीन तर शेतीसाठी दोन आवर्तने आणि बाष्पीभवन व इतर पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी एकूण किमान ५० टीएमसी पाण्याची गरज लागतेच. गतवर्षी उजनी हाऊसफुल्ल भरलेले असतानाही धरणाची पातळी उणे ३६ टक्क्यांपर्यंत खाली गेली होती. यावर्षी तर धरण ६० टक्क्यांपर्यंतच असल्याने संभाव्य पाणी टंचाईचा अंदाज घेऊन उजनीतील पाण्याचे काटेकोर नियोजन आता करावेच लागणार आहे.
सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यांना उजनीचा प्रमुख आधार आहे. पंढरपूर, बार्शीसह जिल्ह्यातील १००हून अधिक ग्रामपंचायतींनाही उजनीचेच पाणी जाते. सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ दूर करण्यात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यात उजनीचा मोठा वाटा राहिला आहे. परंतु, नियोजनाअभावी उजनी बहुतेकवेळा पावसाळ्यात १०० टक्के भरूनही ऐन उन्हाळ्यात धरण उणेच राहिले. गतवर्षी उजनी उणे गेल्याने यंदा जुलै-ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांना पाण्याची गरज असतानाही पाणी सोडले गेले नाही.
