* पंतप्रधानांकडून लवकर बरे वाटण्यासाठी सदिच्छा!
हैदराबाद, ८ डिसेंबर (हिं.स.) : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएस प्रमुख के चंद्रशेखर राव काल, गुरुवारी रात्री फार्महाऊसमध्ये पाय घसरून पडले. यात त्यांच्या कंबरेला मार बसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. त्यांना हैदराबादच्या सोमाजीगुडा येथील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान डॉ. कलवकुंतला संजय हे अस्थिरोग तज्ञ त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती मिळत आहे.
केसीआर यांच्या सध्या केसीआर यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र आज डॉक्टरांकडून त्यांच्या चाचण्या करण्यात येणार आहे. पडल्यानंतर हिप फ्रॅक्चर झाले असावे, असे डॉक्टरांचे मत आहे. गेल्या तीन दिवसांपासून केसीआर राहत्या घरी लोकांची भेट घेत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर पोस्ट लिहित केसीआर यांना लवकर बरं वाटावं, अशा सदिच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांना झालेली दुखापत फारच क्लेशदायक असल्याचेही ते म्हणाले.
केसीआर हे गेली १० वर्षे तेलंगणाचे मुख्यमंत्री होते. मात्र यावेळी त्यांच्या पक्षाला निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान कॉंग्रेसला बहुमत मिळून त्यांना सत्ता स्थापनेची संधी मिळाली. त्यात आता रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत.
हिंदुस्थान समाचार
