मुंबई, २९ नोव्हेंबर (हिं.स.) : भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना आज (बुधवार) सकाळी अटक करण्यात आली. दरम्यान त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची म्हणजे १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम 153(अ), 153 (ब), 153(अ)(1)सी, 294, 504, 505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
नेमकं प्रकरण काय?
शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केले. यावरून शिंदे गटाचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपमानकारक वक्तव्य केले, असा आरोप करत शिंदे गटाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार उपरोक्त कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज, बुधवारी सकाळी आठ वाजता भांडुप पोलिसांनी त्यांना विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक केली.
दरम्यान दळवी यांच्या अटकेचे वृत्त समजताच भांडूप पोलिस ठाण्याबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
हिंदुस्थान समाचार
