डोंबिवली, : इंडिया आघाडी फक्त अफवा पसरवण्याचं काम करत आहे. भारत जोडो यात्रा काढून भारत तोडण्याचे काम करत आहे. भाजपामध्ये परिवर्तन झाले. आत्ताचा भाजपा बदललाय, भाजप हा सर्व जाती धर्मपंथांचा पक्ष आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील, असा विश्वास आहे असे प्रतिपादन केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डोंबिवलीत केले. आठवले राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेसाठी डोंबिवलीत आले होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, अध्यक्ष प्रा. शुक्राचार्य गायकवाड, स्वागताध्यक्ष माणिक उघडे, कार्याध्यक्ष अशोक पगारे, सचिव गुणाजी बनसोडे, किशोर मगरे, नंदा लोखंडे, मीना साळवी, खजिनदार प्रमिला सावंत, जय जाधव, माजी नगरसेवक महेश पाटील आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते. भन्ते महाथोरो ज्ञानज्योती यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
आठवले पुढे म्हणाले, मी योग्य दिशेने पुढे चाललोय त्यामुळे तरुणांनी माझ्यासोबत यावं. बीजेपी सोबत असलो तरी कॉमन मिनिमम प्रोग्राम आधारित युती केली आहे. एकट्याच्या ताकदीवर सत्तेत येणं शक्य नसेल तर मित्र पक्षाच्या ताकदीवर पुढे आलं पाहिजे.
त्यांनी पुढे सांगितले की, वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. वंचितने प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे मल्लिकार्जुन खडगे यांना पत्र लिहून महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, महाविकास आघाडीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आरपीआय महायुतीत आहे. जागेची अडचण होती, शिर्डीसाठी माझा आग्रह होता. मात्र, शिर्डीची जागा सोडता आली नाही. पण बाकीची जी काही आश्वासन दिली आहेत ती आश्वासने ते पाळतील अशी आम्हाला आशा आहे. मनसे अद्याप महायुतीत आलेली नाही त्यामुळे त्यांना कुठली जागा याबाबत अद्याप निर्णय नाही
