गोरेगावात इमारतीच्या पार्किंगमध्ये घडला अपघात
मुंबई, 06 ऑक्टोबर : मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. तर घटनास्थळाहून 46 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोरेगाव पश्चिम परिसरातील जी रोडवरच्या जय भवानी इमारतीला आज, शुक्रवारी पहाटे 3 वाजेच्या सुमाराला भीषण आग लागली. ग्राउंड प्लस 5 मजल्याची ही इमारत होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ धाव घेतली. आग विझवण्यास सुरूवात केली. इमारतीत अडकलेल्या 30 पेक्षा जास्त नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. तर 14 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सात महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर मुंबईतील ट्रॉमा केअर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आगीत तळमजल्यावर वरील काही दुकाने आणि समोर पार्क असलेल्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत. तर गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आगीत 30 पेक्षा अधिक दुचाकी आणि 4 कार जळून खाक झाल्या आहेत. तसेच तळमजल्यावरील काही दुकानेदेखील जळून खाक झाली आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून, सध्या कुलिंगचे काम सुरु आहे.
