तब्बल 24 गाड्या उशिराने धावत आहेत
नवी दिल्ली, 11 जानेवारी (हिं.स.) : देशाच्या विविध भागात कडाक्याच्या थंडीमुळे दाट धुके पसरले आहे. याचा परिणाम रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर झालाय. पर्यायाने राजधानी दिल्लीकडे जाणाऱ्या 24 रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिलीय.
उत्तर, मध्य आणि ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. दाट धुके कायम आहेत, 15 जानेवारीपर्यंत कडाक्याच्या थंडीची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. या कालावधीत पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या भागांमध्ये सकाळी काही तास दाट धुक्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंजाबमधील भटिंडा आणि आग्रा येथे आज, गुरुवारी पहाटे 5:30 वाजता दृश्यमानता शून्य मीटर, त्रिपुराच्या आगरतळा येथे 25 मीटर तर जम्मू, उत्तर प्रदेशातील वाराणसी, मध्य प्रदेशातील सतना, बिहारमधील पूर्णिया, आसाममधील तेजपूर आणि हरियानामध्ये 50 मीटरपर्यंत खाली आली आहे.दिल्लीच्या पालम भागात 100 मीटर आणि भोपाळ आणि राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये 200 मीटरवर दृश्यमानता नोंदवण्यात आली. जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर मध्य प्रदेश, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थान समाचार
