नवी दिल्ली, 1 ऑगस्ट, (हिं.स.)। गुप्तचर विभागामध्ये (इंटेलिजेंस ब्युरो) कार्यरत असलेल्या एका २८ वर्षीय तरुणाने आपल्या २५ वर्षीय बहिणीसह विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझियाबादमधील कविनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गोविंदपुरम भागात ही घटना घडली आहे. अविनाश कुमार आणि अंजली असे मृत भाऊ -बहिणीचे नाव आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही.
अविनाश कुमार दिल्लीच्या गुप्तचर विभागाच्या कार्यलयात होते. तर, त्यांची बहिण अंजली देखील एका खासगी कंपनीत कार्यरत होती. मृत भाऊ – बहिणीचे वडील सुखबीर सिंग हे सरकारी विभागात अधिकारी आहेत. तर, सावत्र आई एका सरकारी शाळेत शिक्षिका आहेत. अविनाश आणि त्याची बहीण अंजली यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबाला मिळताच त्यांनी दोघांनाही कविनगर येथील सर्वोदय रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
संध्याकाळी घरी आल्यावर मुलांना फोन केला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. शेजाऱ्यांनी मदत केली आणि त्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा ते दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले, अशी माहिती अविनाशच्या सावत्र आईने दिली.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत तसापाला सुरु केली. मात्र, पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, असे कविनगरचे एसीपी भास्कर वर्मा यांनी सांगितले.
तर, अविनाशची मावशी रेखा यांनी सावत्र आईवर छळाचे गंभीर आरोप केले आहेत. अविनाशची आई वारल्यानंतर त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आई दोघांचाही छळ करत होती. यामुळे दोघांनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असे अविनाशच्या मावशीने सांगितले.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने
