भंडारा 03 फेब्रुवारी: मागील अनेक वर्षांपासून भंडारा जिल्ह्यात अवैध वाळू चोरीला उत आला असून वाळू चोरी करिता वापरात येणारे टिप्पर कधी बिना नंबरचे तर कधी समोर नंबर प्लेट तर कधी मागे नंबर प्लेट असलेले अनेकदा आढळून आले. मात्र तीन दिवसापूर्वी पकडण्यात आलेल्या दोन टिप्परचे नंबर हे एक सारखे आढळून आल्याने तहसील कार्यालयाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पवनी महसूल विभागाचे कर्मचारी गस्तीवर असतांना सेलारी हनुमान मंदिर परिसरात आठ टिप्पर उभे असल्याचे गस्तीवर असलेल्या पथकांना आढळून आले. टिप्पर येथे उभे कसे, टिप्पर मध्ये गौनखनिज तर नाही ना याची चौकशी वाहन चालकाकडून करीत असताना दोन टिप्परचे नंबर हे एकसारखे आढळून आले. अधिक चौकशी केली असता त्या दोन्ही टिप्परला मागच्या बाजूने नंबर प्लेट लावलेली आढळून आली नाही तर समोरच्या बाजूने एम एच 40 सी डी 9444 हा एकच नंबर आढळून आला. दोन्ही टिप्परचे नंबर प्लेट काढून बघितले असता दुसऱ्या बाजूने दोन्ही नंबर प्लेटवर एम एच 40 सीएम 9444 हा दुसरा नंबर आढळून आला. हे दोन्ही टिप्पर एकाच मालकाचे आहेत. पोलीस व महसूल विभागाची दिशाभूल करण्याकरिता दोन्ही टिप्परचे वेगवेगळे नंबर असतांनी सुद्धा दोन्ही टिप्पर वर एकाच नंबरची प्लेट लावण्यात आल्याने तहसीलदार यांनी कारवाही केली याची माहिती वाहतूक विभागाला दिली असून वाहतूक विभागाने देखील दोन्ही टीप्पर वर कारवाही करण्यात आली आहे. आणखी असे किती टिप्पर जिल्ह्यात धावत असणार यांचा पत्ताच नाही.
