नाशिक, मार्च : सॅलरी अकाऊंटमधून पैसे काढण्याच्या पावतीवर बनावट व खोटी सही करून अज्ञात इसमाने महिलेच्या बँक खात्यातून १ लाख ६५ हजार रुपये परस्पर काढून त्यांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुमन राजेंद्र उत्तेकर (५०, रा. वास्तूरंग अपार्टमेंट, आरटीओजवळ, पेठ रोड, पंचवटी) यांचे जळगाव जनता बँकेच्या सी. बी. एस. शाखेत सॅलरी अकाऊंट आहे. दरम्यान, अज्ञात इसमाने फिर्यादी उत्तेकर यांच्या सॅलरी अकाऊंटमधून पैसे काढण्याची पावती वेळोवेळी भरून त्यावर उत्तेकर यांची बनावट व खोटी सही करून ती पावती बँकेत सादर करून सुमारे १ लाख ६५ हजार रुपये परस्पर काढून त्या रकमेचा अपहार करून फिर्यादी महिलेची फसवणूक केली. हा प्रकार दि. ५ मार्च २०२० ते दि. १५ डिसेंबर २०२२ या कालावधीत घडला.
या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
