पुणे, 24 ऑक्टोबर, (हिं.स.)। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आला असून, याबाबत पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयातून अधिकृत आदेश जारी झाले आहेत. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात आणि पासपोर्ट कार्यालयात घायवळबाबत सविस्तर अहवाल सादर केला होता, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. पासपोर्ट रद्द झाल्याने घायवळच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून, आता त्याच्या प्रत्यार्पणासाठी पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
पुण्याच्या कोथरूड परिसरातील गोळीबार प्रकरणाने निलेश घायवळ पुन्हा चर्चेत आला होता. १७ सप्टेंबर २०२५ रोजी घडलेल्या या रस्त्यावरील भांडणात घायवळ गँगच्या सदस्यांनी स्थानिक नागरिक प्रकाश धुमाळ यावर गोळीबार केला आणि एका विद्यार्थ्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या प्रकरणात घायवळसह आठ साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली. मात्र, तपासादरम्यान घायवळने पोलिसांना चकवा देत परदेशात पळ काढल्याचे उघडकीस आले. तो ११ सप्टेंबरपासून परदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, तो लंडन आणि स्वित्झर्लंडमध्ये असल्याचा संशय आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
