नॅशव्हिल, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। ‘९-१-१ : नॅशव्हिल’ मालिकेच्या पायलट एपिसोडमधून झळकलेली तरुणी अभिनेत्री इसाबेल टेट (वय २३) हिचं निधन झाल्याने हॉलिवूड मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. ‘द मॅक्रे एजन्सी’ने तिच्या निधनाची अधिकृत घोषणा करत म्हटलं आहे की, इसाबेलने सीएमटी (Charcot-Marie-Tooth) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजाराशी लढा देत प्राण सोडले.
तिच्या एजन्सीने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे तिच्या निधनाची माहिती देत कुटुंबाच्या वतीने “ही अचानक आणि धक्कादायक घटना आहे. कृपया या कठीण काळात कुटुंबाला वेळ द्या,” अशी विनंती केली आहे. त्यासोबतच Charcot-Marie-Tooth Association (CMTA) या संस्थेसाठी देणगी देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे, जेणेकरून या आजारावर संशोधनासाठी निधी मिळू शकेल.
तरुण वयातच तेजस्वी प्रवासाचा शेवट
मिडल टेनेसी स्टेट विद्यापीठातून नुकतीच पदवी प्राप्त केलेली इसाबेल, अभिनय क्षेत्रात नवी उमेद दाखवत होती. परंतु या दुर्मिळ आजारामुळे तिच्या जीवनाचा प्रवास लवकर संपला. या आजारामुळे दरवर्षी कुटुंबांवर ५०,००० ते १,००,००० डॉलर्सपर्यंतचा आर्थिक बोजा येतो, आणि इसाबेलच्या निधनाने पुन्हा एकदा या वास्तवावर प्रकाश पडला आहे.
सहकलाकारांनी वाहिली श्रद्धांजली –
‘९-१-१ : नॅशव्हिल’ मालिकेतील सहकलाकार हंटर मॅकवेने सांगितले,“मी इसाबेलला चित्रीकरणापूर्वी ओळखत नव्हतो, पण तिच्यासोबत काम करणे माझ्यासाठी भाग्याचं होतं. ती सदैव आनंदी, ऊर्जावान आणि सर्वांना प्रेरणा देणारी होती.”
इसाबेलच्या आजाराने तिच्या शारीरिक क्षमतांवर मोठा परिणाम केला होता. चालण्यात अडचण, हात थरथरणे, आणि हालचालींसाठी सहाय्यक साधनांचा वापर होता तरीही ती शेवटपर्यंत निर्धाराने अभिनय करत राहिली.
हॉलीवूड आणि नॅशव्हिलमध्ये श्रद्धांजलीची लाट –
इसाबेलच्या निधनानंतर #IsabelleTateRemembers या हॅशटॅगखाली सोशल मीडियावर शोकसंदेशांचा ओघ सुरू झाला. ‘९-१-१ : नॅशव्हिल’ टीमने ऑनलाईन श्रद्धांजली सभा घेतली, तर नॅशव्हिलच्या थिएटर सर्कलमधील कलाकारांनी तिच्या आठवणीत भावपूर्ण पोस्ट शेअर केल्या.
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
