नाशिक, १६ ऑक्टोबर (हिं.स.) : वृद्ध महिलेच्या मालकीची घर मिळकत बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करून घरात बळजबरीने घुसून सोन्याची अंगठी चोरून नेल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी शंकर बबन बोरस्ते (वय ७८, रा. आदर्शनगर, रामवाडी, पंचवटी) हे ”, पत्नीसह राहतात. त्यांच्या पत्नीच्या मालकी हक्काचे घर आहे. या घरात आरोपी हेमा दत्तात्रय बोरस्ते (वय ४८), रा. मधुकर काळूशेठ आहेर (वय ६२), सोनी मधुकर आहेर (वय ४०) व कमलेश कपता (वय ४५, सर्वांचे पत्ते माहीत नाहीत) यांनी संगनमतकरून बेकायदेशीररीत्या घरात प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी बोरस्ते यांच्या पत्नीला मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करून घराच्या तळमजल्याचा बळजबरीने ताबा घेतला, तसेच फिर्यादी दाम्पत्यास तेथे वावरण्यास प्रतिबंध केला, तसेच घर मिळकत ताब्यात घेण्याचा बेकायदेशीर प्रयत्न करून घराच्या मिळकतीत अनाधिकाराने प्रवेश केला, तसेच सोन्याची अंगठी चोरून अपहार करून नुकसान केले. हा प्रकार दि. २९ डिसेंबर २०२२ ते १५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चारही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार
