सोलापूर, 7 जानेवारी, (हिं.स.) सोलापुरात शनिवारी रात्री झालेल्या हिंदू जन आक्रोश मोर्च्याप्रसंगी दोन जाती-धर्मामध्ये विद्वेष फैलावणारे वक्तव्य केल्याचा आरोप झाला. याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजपचे वादग्रस्त आमदार टी. राजा यांच्यासह इतरांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हजारोंचा जनसमुदायासह निघालेल्या या मोर्च्याप्रसंगी रस्त्यावर हुल्लडबाजी करून दगडफेकही करण्यात आल्यामुळे पोलिसांनी त्याचीही दखल घेऊन गुन्हा दाखल केला.
वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा, यसह हिंदुत्वाच्या इतर मुद्यांसाठी सकल हिंदू समाज नावाच्या संघटनेच्यावतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाळीवेस, टिळक चौक, कन्ना चौक मार्गे कन्ना चौकात हा मोर्चा पोहोचल्यानंतर तेथे झालेल्या सभेत आमदार नितेश राणे व आमदार टी. राजा यांनी दोन जाती-धर्मामध्ये विद्वेष फैलावणारी आणि दुसऱ्या धर्मियांच्या विरोधात चिथावणी देणारी भाषणे केली.
हिंदुस्थान समाचार
