नाशिक, ३० डिसेंबर (हिं.स.) :- अवैधरीत्या कत्तलीसाठी आणलेली १४ गोवंश जातीची जनावरे पकडून भद्रकाली पोलिसांनी एकूण २ लाख ९० हजारांचा ऐवज जप्त केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की येथील मीरादातार दर्ग्याजवळ, भोई गल्लीमागे, घर नंबर ३५७३ च्या समोर असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये सात गायी व चार वासरे अशी एकूण ११ गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी आणली असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना समजली.
त्यांनी या ठिकाणी जाऊन ही जनावरे जप्त करीत असताना आणखी एक गाय व दोन वासरे अशी तीन जनावरे मिळून १४ जनावरे आढळून आली.
हा मुद्देमाल एकूण २ लाख ९० हजारांचा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
या आरोपींवर भा. दं. वि. कलम ४२९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेली गोवंश जातीची ही जनावरे पालनपोषण करण्यासाठी नाशिकच्या पांजरापोळमध्ये पाठविण्यात आली आहेत.
हिंदुस्थान समाचार
