
डोंबिवली, ३० ऑक्टोबर (हिं.स.) : डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी सराईत साखळी चोरांना अटक केलीय. वारिस मिराज खान (२४) आणि मोहम्मद जाफर कुरेशी ( ३०) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या चोरट्यांकडून ८ लाख ६८ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला.
याबाबत मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात साखळी चोरांचा उपद्रव वाढला होता. मानपाडा पोलीसांनी निसर्ग हॉटेल समोरील रोडवर साध्या वेशात तीन ठिकाणी सापळा लावला. तळोजा रोडकडुन आरोपीची मोटार सायकल निसर्ग हॉटेल जवळ येताच पोलीसानी त्यांना जाळ्यात अटकवण्यासाठी रस्त्याने येणारी जाणारी वाहने रोडवर थांबवली. या प्रकारचा आरोपींना संशय आला आणि आरोपींनी आपली मोटार सायकल रोडवर टाकून पळण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले. वारिस मिराज खान आणि मोहम्मद जाफर कुरेशी अशी या चोरट्यांची नावे आहेत. आरोपींनी चेन स्नॅचिंगचे ८ आणि मोटार सायकल चोरीचा १ गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या दोन्ही चोरट्यांकडून सर्व गुन्हयामध्ये ८,१८,५००/- रूपये किंमतीचे १५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ५० हजार रूपये किंमतीची चोरीची बजाज पल्सर मोटार सायकल असा एकुण ८,६८,५००/- रूपये किंमतीचा मुददेमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे.
हिंदुस्थान समाचार
