सोलापूर 17 डिसेंबर ( हिं.स) : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या प्रिसीजन, ओॲसिस, इलिझियम-जामश्री व बालाजी अमाईन्स पुरस्कृत महिलांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन १७ ते २४ डिसेंबर या कालावधीत एम.एस.एल.टी.ए. टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रिसिजन समूहाचे चेअरमन यतिन शहा व राजीव देसाई यांनी दिली.
या स्पर्धेसाठी भारतासह १४ देशातून एकूण ५६ महिला सहभागी होणार असून यामध्ये २२ महिला खेळाडू या परदेशी असणार आहेत. सोलापूर व लगतच्या जिल्हयामध्ये लॉन टेनिस खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा व सोलापूरचे नांव जागतिक पातळीवर व्हावे या उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्याचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय टेनीस फेडरेशनने इराणच्या समन हसानी यांची सामना पर्यवेक्षक तर राज्य संघटनेचे संयुक्त सचिव राजीव देसाई यांची सामना संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अखिल भारतीय लॉन टेनिस संघटनेने श्रीराम गोखले (पुणे), सैकत रॉय (कलकत्ता), रोहित बालगवी (धारवाड), श्रध्दा दलि (मुंबई), रिया चाफेकर (पुणे), जॉय खलील (लेबनन), सोनम यंगचेन (भुतान) यांची नियुक्ती केलेली आहे.
हिंदुस्थान समाचार
