सोलापूर, 29 डिसेंबर, (हिं.स.) – जिल्हा परिषदांमधील शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून, आता माध्यमिक शिक्षक भरतीलाही सुरवात होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील एक हजार ५४ अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये जवळपास ५५० शिक्षकांची भरती होणार आहे.पण, ज्या अनुदानित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पदे रिक्त आहेत त्यांना प्रारंभी शिक्षणाधिकाऱ्यांकडून रोस्टर (बिंदुनामावली) तपासून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली अंतिम करून घ्यावी लागेल. शेवटी संबंधित शाळांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करावी लागणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेला नवीन शिक्षक भरतीतून मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये ६७८ शिक्षकांची भरती होणार आहे. मागासवर्गीय कक्षाने बिंदुनामावली अंतिम केल्यानंतर डिसेंबरअखेर रिक्तपदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे.
हिंदुस्थान समाचार
