ठाणे, 14 डिसेंबर, (हिं.स.) – तंबाखू आणि सुपारी जी एकतर स्वादिष्ट, सुगंधित किंवा कोणत्याही अपमिश्रकासोबत मिसळलेली जाते आणि अन्य नावाने चालणारी किंवा गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट / सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट / सुगंधी सुपारी, अपमिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याची तंबाखू, खर्रा, मावा या स्वरूपात किंवा अन्य कोणत्याही नावाने संबोधली जाणारी किंवा कसे, ग्राहकाला मिश्रण करण्यास सहजरित्या सुलभ होईल अशा रीतीने विकलेली किंवा वितरित केलेली स्वादिष्ट / सुगंधी तंबाखू आणि अपमित्रकेयुक्त उत्पादित चघळण्याची तंबाखू आणि स्वादिष्ट / सुगंधी सुपारी, गुटखा, पानमसाला, खर्रा, मावा व तत्सम पदार्थ एक उत्पादन म्हणून किंवा निराळे उत्पादन म्हणून आवेष्टित केलेली किंवा खुले असलेल्या आणि / किंवा विकलेली किंवा कसे, याची निर्मिती, साठवण, वितरण, वाहतूक (महाराष्ट्र राज्यामध्ये व महाराष्ट्र राज्यातून) किंवा विक्री यास जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी दि.१८ जुलै २०२३ पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध केलेला आहे.
प्रशासनास वाहन क्रमांक RJ-14-CH 1311 मधून प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्रीसाठी वाहतूक होत असल्याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर या वाहनाची तपासणी केली असता त्यात रॉयल १०००, दिलबाग प्लस पानमसाला, यस प्लस चघळण्याचा तंबाखू आढळून आल्याने या प्रतिबंधित अन्नपदार्थाचे अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत नमुने घेवून त्याचा सुमारे ३५ लक्ष ४४ हजार ८०/- एवढ्या किंमतीच्या साठ्यासह सदरचे वाहन किंमत अंदाजे १५ लक्ष ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी कळवा पोलीस स्टेशन, ठाणे येथे श्री.अवदेशकुमार शुक्रूलाल पाल, वय ३३ वर्ष यांच्यासह त्याचा साथीदार यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १८८, २७२, २७३, ३२८ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ चे कलम ५९ नुसार दि.२८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रथम खबरी अहवाल क्र. ०६३७/२०२३ नोंदविण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस विभागामार्फत करण्यात येत आहे.
ही कार्यवाही अन्न व औषध प्रशासन विभागाचे कॅबिनेट मंत्री श्री. धर्मराव बाबा आत्राम यांचे आदेश व श्री. अभिमन्यू काळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सूचनेनुसार श्री. सुरेश देशमुख, सह आयुक्त (अन्न), कोकण विभाग, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राजू आकरूपे, अन्न सुरक्षा अधिकारी, ठाणे यांनी केली.
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य ठाणे यांनी ०१ एप्रिल २०२३ पासून अद्यापपर्यंत कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील १२९ आस्थापनांची तपासणी केली असता १२९ ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थाचा सुमारे २ कोटी ३४ लक्ष रुपयाचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा ताब्यात घेण्यात आलेला असून संबंधित कार्यक्षेत्राच्या पोलीस स्टेशनमध्ये सर्व संबंधिताविरुद्ध एकूण ४१ एफआयआर नोंदविण्यात आलेले आहेत तर ११९ आस्थापना सील करण्यात आलेली असून सहा वाहने प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या व्यवसाय करतात म्हणून ताब्यात घेण्यात आलेली आहेत.
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य ठाणे यांनी माहे नोव्हेंबर, २०२३ मध्ये कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील ७८ आस्थापनांची तपासणी केली असता ७८ ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थाचा सुमारे ३८ लक्ष रुपयाचा प्रतिबंधित अन्न पदार्थ्यांचा साठा ताब्यात घेण्यात आलेला असून संबंधित कार्यक्षेत्राच्या पोलीस स्टेशनमध्ये सर्व संबंधिताविरुद्ध एकूण १९ एफआयआर नोंदविण्यात आलेले आहेत तर ७४ आस्थापना सील करण्यात आलेली असून एक वाहन प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या व्यवसाय करतात म्हणून ताब्यात घेण्यात आलेली आहेत. अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, कोकण विभाग यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचे तसेच पानटपरी चालकांचे धाबे दणाणले आहेत.
अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ हा जनहित व जनआरोग्य यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा कायदा असून सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा त्याचा प्रमुख उद्देश व उद्दिष्ट आहे.
गुटखा, पानमसाला, सुगंधित/स्वादिष्ट सुपारी, स्वादिष्ट / सुगंधी तंबाखू, खरा खर्रा, मावा इत्यादी अन्नपदार्थ हे मानवी शरीरास अत्यंत अपायकारक व घातक असून त्यांच्या सेवनामुळे आणि किंवा चघळल्यामुळे भावी पिढीच्या जनुकीय रचनेमध्ये फेरबदल होऊ शकतात, अक्युट हायपर मॅग्नेशिया, हृदयरोग, ओरल सब म्युकस फायब्रोसिस, मुखाचा कर्करोग, ल्यूक्योप्लाकिया अन्ननलिकेचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, मेटाबोलिक अबनॉर्मलिटी, प्रजनन, स्वास्थ्य व आरोग्य, जठर, आतडे व श्वसन संस्थेचे आजार होत असल्याचे वैज्ञानिक संशोधनातून आढळून आलेले आहे, सिद्ध झालेले आहे.
जनहित व जनआरोग्य विचारात घेता प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि किंवा विक्री करणाऱ्या विरुद्ध यापुढेही अशीच धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे श्री. सुरेश देशमुख, सह आयुक्त (अन्न), ठाणे यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक व गरजेचा असल्याने प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वितरण, वाहतूक किंवा विक्री होत असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी यासह प्रतिबंधित अन्नपदार्थाचे मानवी शरीरावर होणारे अत्यंत घातक परिणाम / दुष्परिणाम विचारात घेता या अन्नपदार्थाचे सेवन न करण्याबाबत तसेच या अन्नपदार्थाच्या सेवनाच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कोकण विभाग, ठाण्याचे अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त (अन्न) श्री. सुरेश देशमुख यांनी जनतेस केले आहे.
हिंदुस्थान समाचार
