पुणे 13 नोव्हेंबर (हिं.स) रेल्वे प्रशासनाने तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांच्या विरोधात कारवाई केली आहे. मध्य रेल्वेत २६९ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणी ३१७ जणांवर अटकेची कारवाई झाली आहे. पुणे विभागात ५६ दलालांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर ७४ जणांवर अटकेची कारवाई झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी ही कारवाई मध्य रेल्वेच्या पाचही विभागांत केली.
रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी ‘आरपीएफ’ने पाचही विभागांत या दलालांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व सूत्रांकडून समजणाऱ्या गोपनीय माहितीच्या आधारे ‘आरपीएफ’ने स्थानक परिसरात असलेल्या खासगी ट्रॅव्हलच्या कार्यालयांत छापे टाकले. या वर्षात एकूण २६९ दलालांवर कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे तीन लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
हिंदुस्थान समाचार
