अमरावती, 2 सप्टेंबर (हिं.स.) परतवाडा-अंजनगाव मार्गावरील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्राच्या शेतशिवारात 1 सप्टेंबर रोजी एका महिलेचा सांगड मिळून आला होता. या अज्ञात महिलेच्या शतविछेदित सांगड्याची ओळख 24 तासाच्या आत पटवण्यात परतवाडा पोलिसांना यश आले आहे.मृत महिलेचे नाव लता सुंदरलाल वर्मा असे आहे. ही महिला काही काळापूर्वी बेघर निवाऱ्यात ठेवण्यात आली होती. ती गंभीर स्वरूपाच्या कुष्ठरोगाने ग्रस्त होती व एकाच ठिकाणी थांबत नसे. त्यामुळे तिचा ठावठिकाणा निश्चित करता येत नव्हता.घटनास्थळी परतवाडा पोलिसांच्या पथकासोबतच फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम आणि उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी धाव घेतली होती. सांगड्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास परतवाडा पोलीस करीत आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी
