मुंबई, 2 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) ने इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि स्पीकर्स निर्मिती करणाऱ्या बोटच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंगला (आयपीओ) हिरवा कंदील दाखवला आहे. बोटसह अर्बन कंपनी, ज्युनिपर ग्रीन एनर्जी लिमिटेड यांच्यासह एकूण १३ कंपन्यांच्या आयपीओला मंजुरी मिळाली आहे. बोटची मूळ कंपनी इमॅजिन मार्केटिंग लिमिटेडने ८ एप्रिल रोजी आयपीओसाठी ड्राफ्ट पेपर्स दाखल केले होते. या आयपीओचा एकूण आकार अंदाजे २ हजार कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. यामध्ये कंपनीकडून ९०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स शेअर्स जारी करू शकते. तर १,१०० कोटी रुपयांचे शेअर्स विद्यमान गुंतवणूकदारांकडून ऑफर फॉर सेल (ओएफएस) च्या माध्यमातून विकले जातील. यामुळे बोटला भांडवल उभारण्याची नवी संधी मिळणार असून कंपनीचा बाजारातील विस्तार आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होणार आहे. यापूर्वी २०२२ मध्येही बोटने २ हजार कोटी रुपयांच्या आयपीओसाठी अर्ज केला होता. मात्र त्या वेळी प्रतिकूल बाजार परिस्थितीमुळे कंपनीने आपला अर्ज मागे घेतला होता. लिस्टिंगऐवजी कंपनीने त्यावेळी ६० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ५२० कोटी रुपये खाजगी निधी उभारण्याचा निर्णय घेतला होता. सध्याच्या अनुकूल बाजार परिस्थितीत कंपनीने पुन्हा आयपीओचा मार्ग निवडला असून सेबीकडून मिळालेल्या मंजुरीनंतर गुंतवणूकदारांची उत्सुकता वाढली आहे. तज्ञांच्या मते, बोटसारख्या देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक ब्रँडच्या लिस्टिंगमुळे केवळ ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रालाच चालना मिळणार नाही, तर स्टार्टअप इकोसिस्टमलाही बळकटी मिळेल. कंपनीने अल्पावधीतच भारतीय बाजारपेठेत मजबूत स्थान मिळवल्याने तिच्या आयपीओकडे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
