अमरावती, 23 ऑगस्ट, (हिं.स.)। चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा परिसरात गुटख्याची अवैध वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेऊन त्यामधील २ लाख २९ हजार ६८० रुपयांचा गुटखा व वाहन जप्त केले. तर आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. ही कारवाई गुन्हेशाखेच्या पथकाने २२ ऑगस्ट रोजी केली आहे.
विनोद ऊर्फ विनायक अशोकराव काळे (३७) रा. करजगाव असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हेशाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, आरोपी विनोद काळे हा त्याच्या मारुती कार क्र. एमएच २७बीव्ही ८४८७ ने गुटख्याची अवैध वाहतूक करीत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी करजगाव येथे आरोपीच्या घराकडे जात असताना त्याला पोलिस आल्याची भनक लागली. त्यामुळे तो वाहन सोडून पळून गेला. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मागच्या सीटवर प्रतिबंधक सुगंधित तंबाखुजन्य पानमसाल्याची ७ पोती आढळून आली.
आढळलेला सर्व माल किंमत अंदाजे २ लाख २९ हजार ६८० रुपये व वाहन किंमत अंदाजे ९ लाख रुपये असा एकूण ११ लाख २९ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
—————
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी
