मुंबई, 23 ऑगस्ट (हिं.स.)। 90 च्या दशकात अक्षय कुमार आणि सैफ अली खान ही जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. या काळात दोघांनी मिळून अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते, ज्यात मैं खिलाड़ी तू अनाड़ी, तू चोर मैं सिपाही, दिल्लगी आणि आरजू यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यानंतर बराच काळ या जोडीची जोडी पडद्यावर दिसली नाही. 2008 मध्ये दोघे टशन या चित्रपटात एकत्र झळकले होते. आता जवळपास 16 वर्षांनी अक्षय आणि सैफ पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या नवीन चित्रपटाचं नाव आहे हैवान, ज्याचं दिग्दर्शन प्रियदर्शन करत आहेत. या चित्रपटाचं शूटिंग नुकतंच सुरू झालं आहे. अलीकडेच अक्षय कुमारने सेटवरून एक व्हिडिओही शेअर केला आहे.
अक्षय कुमार आणि सैफ अली खान हे सध्या त्यांच्या आगामी हैवान चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला अधिकृतरीत्या सुरुवात झाली आहे. या निमित्ताने अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तो हातात हैवान नावाचं लिहिलेलं क्लॅपबोर्ड धरलेला दिसतो. या व्हिडिओमध्ये अक्षय, सैफ अली खान आणि दिग्दर्शक प्रियदर्शन मजा-मस्ती करताना आणि गप्पा मारताना दिसतात. व्हिडिओसोबत अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे – “आपण सगळे थोडे शैतान असतो. काही संत असतात, तर काही आतून राक्षस. माझ्या आवडत्या दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत हैवान चित्रपटाचं शूटिंग सुरू करत आहे. 18 वर्षांनंतर सैफसोबत काम करून खूप आनंद झाला आहे. चला, हैवानियतची सुरुवात करूया.”
फॅन्सना अक्षय कुमार आणि सैफ अली खान ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने ते खूप उत्साहित आहेत. अलीकडे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोघेही कलाकार शूटिंग सुरू करण्यासाठी प्रचंड उत्साहात दिसत आहेत. दरम्यान, अक्षय कुमारचा दुसरा बहुप्रतिक्षित चित्रपट जॉली एलएलबी 3ही रिलीजसाठी सज्ज आहे. यावेळी चित्रपटात प्रेक्षकांना डबल धमाका मिळणार आहे कारण दोन्ही जॉली – अरशद वारसी आणि अक्षय कुमार – एकत्र झळकणार आहेत. त्यांच्यासोबत सौरभ शुक्ला पुन्हा एकदा जजच्या भूमिकेत परत येत आहेत. या चित्रपटात अक्षय आणि अरशदची कॉमेडी जुगलबंदी प्रेक्षकांना भरपूर हसवणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
