पुणे, 23 ऑगस्ट (हिं.स.)। गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने किमान चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, ध्वनिप्रदूषण वाढविणारे कर्णकर्कश ध्वनिक्षेपक व लाईट- लेझर शो टाळावेत, अशा स्पष्ट सूचना पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी दिल्या.
ग्रामीण पोलिस मुख्यालयात लोणावळा, खेड, जुन्नर आणि शिरूर उपविभागातील 18 पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील 128 गणेश मंडळाध्यक्ष, पोलिस पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या वेळी ते बोलत होते.
बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, वीज वितरण कंपनी, परिवहन, उत्पादन शुल्क अशा विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरासह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही गेल्या काही दशकांत गणेशोत्सवाची परंपरा मजबूत झाली आहे. प्रत्येक गावात मंडळांनी सामाजिक उपक्रम, लोकजागृती, सांस्कृतिक कार्यक्रमांचा धागा जपला आहे. अनेक ठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे कायदा- सुव्यवस्था अबाधित राखून हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून निजोजन केले जाते.
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
