सोलापूर, 03 मार्च (हिं.स.)।शहरात मावा व गुटखा विक्रीवर बंदीचे आवाहन करूनही नियम धाब्यावर बसवणाऱ्या विक्रेत्यांविरोधात अक्कलकोट नगर परिषदेने अखेर धडक कारवाईचा बडगा उगारला. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ आणि शाळा परिसरातील विविध पानटपऱ्या, किराणा दुकाने व होलसेल विक्रेत्यांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात मावा व गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करत भविष्यात नियमभंग केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, आरोग्य सभापती अविनाश मडीखांबे, आरोग्य अधिकारी नितीन शेंडगे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. नगरपरिषद आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाच्या पथकाने अचानक छापे टाकल्याने विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.दोन दिवसांपूर्वी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व विक्रेत्यांना मावा व गुटखा विक्रीबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही विक्री तातडीने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र काही विक्रेते सूचनांकडे दुर्लक्ष करून सर्रास विक्री करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात आला.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
