नाशिक, २४ ऑक्टोबर, (हिं.स) – ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडल्यानंतर आता देवळा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावा दरम्यानच्या गिरणा नदीपात्रात ड्रग्जचा मोठा साठा मुंबई पोलिसांना मिळून आला आहे. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून ही माहिती समोर आली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
ललित पाटीलचा साथीदार सचिन वाघ याने शिंदे गावातील कारखान्यात बनविलेले ड्रग्ज नष्ट करण्याच्या हेतूने गिरणा नदीपात्रात फेकून दिले होते. सचिन वाघच्या तपासात ही माहिती उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलीस सचिन वाघसह नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास देवळा तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळ नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली. पोलिसांच्या मदतीला रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हिंगचे पथक दाखल झाले आहे. मध्यरात्रीपासून सुरू झालेले शोधकार्य रात्रभर सुरूच होते. आतापर्यंत पथकाला सुमारे ५० किलो वजनाच्या दोन गोण्या ड्रग्ज नदीपात्रात फेकल्याचे सचिन वाघने पोलिसांना तपासादरम्यान सांगितले.
त्यानुसार पोलीस पथकाकडून कॅमेऱ्याच्या माध्यमातून ड्रग्जचा शोध घेण्यात आला. मात्र नदीपात्रात १५ ते २० फूट खोल पाणी असल्याने ड्रग्जचा साठा अद्याप बाहेर काढण्याच काम सुरू होते. जवळच असणाऱ्या सरस्वतीवाडी भागातून १५ किलो ड्रग्ज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज नष्ट करण्याचा प्रयत्न सचिन वाघ याने केला होता. मात्र मुबंई पोलिसांनी त्याचा छडा लावला आहे.सध्या ललित पाटील आणि सचिन वाघ २७ ऑक्टोबरपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहे. ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी साथीदार ड्रायव्हर सचिन वाघ याने मदत केली होती. ललित पाटील यांच्या सांगण्यावरून सचिन वाघने ड्रग्ज लपवले किंवा त्याचे विल्हेवाट लावली आहे, असा पोलिसांना संशयआहे.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नाशिकच्या शिंदे गावात मुंबई पोलिसांनी ड्रग्ज कारखाना उध्वस्त केला आणि त्यानंतर सोलापूर, संभाजीनगर, पालघर, पुणेसह अनेक जिल्ह्यात पोलिसांनी छापे टाकत एम डी ड्रग्ज आणि अवैध धंद्यांविरोधात कारवाई करत कोट्यवधींचा माल हस्तगत केल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखे मागील दोन आठवड्यात १२ ड्रग्ज पेडलरल अटक केली असून यातील एक आरोपी हा मुंब्राचा, एक कल्याणचा तर बाकी नाशिकमधीलच रहिवासी आहेत. त्यांचे आणखी साथीदार असण्याची शक्यता आहे. यातील अनेक पेडल हे सराईत गुन्हेगार आहेत, कोणावर खून कोणावर प्राणघातक हल्ले, घरफोडी, मारहाणी गुन्हे दाखल आहेत. त्यांनी हे ड्रग्ज कुठून आप ? कोणाला विकले ? यासोबतच ललित पाटील, भूषण पाटील तसेच अभिषेक बलकवडे यांच्या हे संपर्कात होते का? या दिशेने देखील पोलिसांचा तपास सुरू आहे.
हिंदुस्थान समाचार
