नाशिक, 19 जून (हिं.स.)। खासगी सावकारी करणाऱ्या इसमाच्या घरावर छापा टाकून सहकार अधिकारी उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने अनेक लोकांच्या सह्या टाकून केलेले कोरे धनादेश, हातउसनवार दस्त नोटरी यासह करारनामा, तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
याबाबत सहकारी संस्था, नाशिकचे सहकार अधिकारी, उपनिबंधक वैशाली विठ्ठल आव्हाड (रा. जेलरोड, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की आरोपी सागर भुखन वैष्णव (वय ४५, रा. माळी कॉलनी, पार्थ हॉटेलच्या मागे, ता. जि. नाशिक) या खासगी सावकाराविरुद्ध काही तक्रारी सहकार उपनिबंधक कार्यालयाकडे आल्या होत्या.
त्या अनुषंगाने सहकार अधिकारी, उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने वैष्णव याच्या राहत्या घरी छापा टाकला. त्यावेळी पथकाने घराची झडती घेतली असता त्यावेळी घरामध्ये अनेक इसमांचे सह्या केलेले कोरे धनादेश, हातउसनवार दस्त /नोटरी व मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे साठेखत, कब्जा साठे खत, मशीन विक्री करारनामा, मशीन वापराचा करारनामा यासंबंधी धारिका आढळून आल्या. त्यामुळे आरोपी सागर वैष्णव हा अवैधरीत्या सावकारी व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे सावकारांचे उपनिबंधक तथा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्याकडील प्राप्त पत्रान्वये हा गुन्हा सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बटुळे करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI
