नाशिक, – मेफेड्रॉनसदृश सुमारे एक लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना मिळून आलेल्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मेफेड्रॉन हस्तगत करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस हवालदार गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की आरोपी सागर रामदास शिंदे (३०, रा. पिंपळपट्टी रोड, जेलरोड, नाशिकरोड), जाफर पटेल (रा. कथडा, जुने नाशिक) व सैफुला भाई (रा. अशोका रोड, नाशिक) हे तिघे जण भगवती लॉन्सकडून पंचक गावाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर काही जण मेफेड्रॉन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सापळा रचला असता त्या ठिकाणी हे तीनही आरोपी १ लाख ६ हजार ५५० रुपये किमतीचा मेफेड्रॉनसदृश अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कबजात बाळगताना मिळून आले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून मॅफेड्रॉन अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकमधून मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन हस्तगत करण्याची कारवाई करण्यात आली होती. यामध्ये ललित पाटील या म्होरक्यासह त्याच्या इतर साथीदारांना पोलिसांनी चौकशीसाठी अटक केली आहे. हे प्रकरण ताजे असताना नाशिकरोड येथे एक लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.
