मुंबई, 12 डिसेंबर (हिं.स.)। गूगलने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी असे नवे फीचर लॉन्च केले आहे, जे आपत्कालीन परिस्थितीत कोणाच्याही जीवाची सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकते. या फीचरचे नाव इमर्जन्सी लाईव्ह व्हिडिओ असून नावावरूनच त्याचे काम सहज लक्षात येते. इमर्जन्सीच्या वेळी वापरकर्ता आपल्या फोनच्या कॅमेऱ्यातून थेट परिस्थितीचा व्हिडिओ मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो, ज्यामुळे योग्य वेळी योग्य दिशानिर्देश मिळू शकतात.
गूगलच्या अधिकृत ब्लॉगनुसार, इमर्जन्सी कॉल किंवा मेसेज दरम्यान कंट्रोल रूममधील डिस्पॅचर आपल्या फोनवर लाईव्ह व्हिडिओची रिक्वेस्ट पाठवू शकतो. वापरकर्त्याने फक्त एका टॅपमध्ये हा व्हिडिओ सुरु केला की मदत पथकाला घटनास्थळाची अचूक माहिती रिअल-टाइममध्ये मिळते. हे फीचर सध्या काही देशांमध्ये रोलआउट झाले असून लवकरच इतर देशांतही उपलब्ध होणार आहे.
गूगलने सांगितले की इमर्जन्सीच्या वेळी बहुतेक लोक घाबरलेले असतात आणि परिस्थिती नेमकी काय आहे हे नीट समजावून सांगू शकत नाहीत. या समस्येवर उपाय म्हणून हे फीचर विकसित करण्यात आले आहे. लाईव्ह व्हिडिओमुळे रेस्क्यू टीमला परिस्थिती स्पष्ट दिसते आणि CPRपासून ते इतर सुरक्षात्मक मार्गदर्शनापर्यंत सर्व काही अचूकपणे दिले जाऊ शकते. हा व्हिडिओ पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतो आणि वापरकर्ता कधीही स्ट्रीमिंग थांबवू शकतो.
हे फीचर Emergency Location Service (ELS) या अस्तित्वात असलेल्या अँड्रॉइड इन्फ्रास्ट्रक्चरवर आधारित आहे. ELS क्षणार्धात आणि अचूक लोकेशन इमरजन्सी सेवांपर्यंत पोहोचवते. इमर्जन्सी लाईव्ह व्हिडिओ सुरु करण्यासाठी वापरकर्त्याला कोणतीही स्वतंत्र सेटिंग ऑन करण्याची गरज नाही. कॉल किंवा मेसेज केल्यावर डिस्पॅचर परिस्थितीनुसार व्हिडिओची मागणी करतो आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रॉम्प्टद्वारे एकाच टॅपमध्ये लाईव्ह व्हिडिओ सुरु करता येतो.
गूगलने स्पष्ट केले की हे फीचर अमेरिकेत, जर्मनीतील काही भागांमध्ये आणि मेक्सिकोतील निवडक प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे. अँड्रॉइड 8 किंवा त्यापुढील व्हर्जन आणि अपडेटेड Google Play Services असलेले फोन या फीचरला सपोर्ट करतील. गूगल सार्वजनिक सुरक्षा संस्थांसोबत मिळून हे फीचर अधिक देशांमध्ये आणण्याचे काम करत आहे.
गेल्या काही वर्षांत गूगलने Emergency Location Service, Car Crash Detection, Fall Detection, Satellite SOS यांसारखी अनेक महत्त्वाची फीचर्स दिली आहेत. आता ‘इमर्जन्सी लाईव्ह व्हिडिओ’ या नव्या सुविधेमुळे अँड्रॉइडची इमर्जन्सी सर्विसेसची व्यवस्था अधिक सक्षम व प्रभावी होणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
