
मुंबई, 29 नोव्हेंबर, (हिं.स.)। मुंबईत झालेल्या ‘हाऊस ऑफ इंस्टाग्राम’ कार्यक्रमात मेटा प्लॅटफॉर्म्सनं भारतातील क्रिएटर्सना मोठी भेट दिली आहे. कंपनीनं इंस्टाग्राम, फेसबुक आणि एडिट्स अॅपसाठी बंगाली, मराठी, तेलुगु, कन्नड आणि तमिळ या पाच नव्या भारतीय भाषांचा सपोर्ट जाहीर केला असून, या सुविधेमुळे क्रिएटर्सना देशाच्या विविध भागांत सहज पोहोच वाढवता येणार आहे.
या घोषणेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे रील्ससाठी उपलब्ध होणारी एआय-आधारित ऑटोमॅटिक डबिंग आणि लिप-सिंक सुविधा. या तंत्रज्ञानाद्वारे क्रिएटर्स आपले रील्स मराठी, कन्नड, तमिळ, तेलुगु आणि बंगाली भाषांमध्ये सहज अनुवादित करू शकतील. विशेष म्हणजे, मेटा एआय क्रिएटरच्या मूळ आवाजातील टोन आणि भावना जुळवून अनुवादित आवाज तयार करते, त्यामुळे रील्स पूर्णपणे नैसर्गिक वाटतात. लिप-सिंक फिचरमुळे तोंडाच्या हालचाली नव्या भाषेशी तंतोतंत जुळतात आणि क्रिएटर खरंच त्या भाषेत बोलत असल्याचा भास होतो. यापूर्वी ही सुविधा इंग्रजी, हिंदी, स्पॅनिश आणि पोर्तुगीजपुरती मर्यादित होती.
याशिवाय मेटाच्या ‘एडिट्स’ या मोबाईल व्हिडिओ एडिटिंग अॅपमध्येही भारतीय भाषांसाठी नवे फॉन्ट्स जोडले जात आहेत. असमिया, बंगाली, हिंदी आणि मराठी भाषांसाठी देवनागरी तसेच बंगाली-असमिया स्क्रिप्टमधील आकर्षक फॉन्ट्स आता अँड्रॉइड अॅपमध्ये उपलब्ध होणार असून, पुढील काही दिवसांत अपडेटद्वारे हे फॉन्ट्स वापरकर्त्यांपर्यंत पोहोचतील.
नवे फॉन्ट्स वापरण्यासाठी एडिट्स अॅप उघडून प्रोजेक्ट निवडावा, नंतर ‘Text’ पर्यायातून ‘Aa’ आयकॉनवर क्लिक करावे. जर डिव्हाइस देवनागरी किंवा बंगाली-असमिया स्क्रिप्टमध्ये असेल तर नवे फॉन्ट्स थेट दिसतात. अन्य डिव्हाइसवर ‘All Fonts’ टॅबमध्ये जाऊन भाषेनुसार फिल्टर करून हे फॉन्ट्स निवडता येतात.
मेटाच्या मते भारत ही कंपनीची सर्वात मोठी बाजारपेठ असून येथील क्रिएटर्स जगातील सर्वाधिक सक्रिय आहेत. नव्या भाषिक सुविधा आणि प्रादेशिक फॉन्ट्सच्या उपलब्धतेमुळे स्थानिक भाषांतील कंटेंट क्रिएशनला मोठी गती मिळेल तसेच प्रादेशिक क्रिएटर्सना आपली स्वतंत्र ओळख मजबूत करण्याची संधी मिळणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
