सोलापूर, 29 नोव्हेंबर (हिं.स.)।
सोलापुरात एकाच दिवशी तीन घरफोडी करून तब्बल वीस लाखांचा मुद्देमाल चोरणार्या दोन आंतरराज्यीय चोरट्यांना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांनी चोरलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली.विजापूर रोडवर राहणार्या सतीश शिवप्पा सोलापुरे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 4 लाख 87 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. त्यानंतर सैफुल येथील एल. श्रवणकुमार लगून यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील 19 लाख 33 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले, तर पूजा सचिन जाधव यांच्या घरातदेखील चोराचा प्रयत्न करण्यात आला.एकाच दिवशी तीन ठिकाणी घरफोडी झाल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या आठवडाभरात कर्नाटकातील दोन आंतरराज्य चोरट्यांना पकडले. राघवेंद्र उर्फ रघू उर्फ नागराज शंभू नाईक (वय 32, रा. मण्णेगीगांव, ता. होन्नावार, जि. कारवार, कर्नाटक) आणि त्याचा साथीदार लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक (वय 28, रा. वसूर, बेळगाव, कर्नाटक) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 13.3 तोळ्याचे सोन्याचे दागिने तसेच एक किलो 840 ग्रॅम चांदीचे दागिने आणि वस्तू असा एकूण 20 लाख 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे दोघे सराईत गुन्हेगार असून एकावर तीन तर दुसर्यावर सहा गुन्हे दाखल आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
