मुंबई, 25 ऑगस्ट (हिं.स.)। बहुसंख्य भारतीयांचा असा विश्वास आहे की डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार केवळ पावसाळ्यातच नव्हे तर वर्षभरात कधीही होऊ शकतात. गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या (जीसीपीएल) आघाडीच्या गुडनाइट ब्रँडने ‘डास एक, धोके अनेक’ या मोहिमेखाली देशभर केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला आहे.
या सर्वेक्षणानुसार, पूर्व भारतातील 86% लोक या वास्तवाशी सहमत असून, पश्चिम भारतातील 81%, तसेच उत्तर आणि दक्षिण भारतातील 80% लोक याच मताचे आहेत. हवामान बदल आणि शहरीकरणामुळे डास वर्षभर प्रजननक्षम राहतात, त्यामुळे डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढला आहे.
सर्वेक्षणात पालकांची जागरूकताही अधोरेखित झाली आहे. जवळपास 95% पालक खरेदी करताना उत्पादनांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबद्दल अधिक सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले. यात दक्षिण भारत 97% सह अव्वल, तर पूर्व भारत 96%, पश्चिम 95% आणि उत्तर 92% असा क्रम दिसून आला.
नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल (एनसीव्हीबीडीसी) च्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी भारतात डेंग्यूचे 2.33 लाखांहून अधिक रुग्ण आढळले. 20 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जागतिक डास दिनानिमित्त हे निष्कर्ष प्रतिबंधात्मक कारवाईचे महत्त्व अधोरेखित करतात.
गुडनाइटच्या होम केअर विभाग प्रमुख शिल्पा सुरेश यांनी सांगितले की, “डेंग्यू-मलेरियाचा धोका वर्षभर असल्याने कुटुंबांचे संरक्षण करणारे सुरक्षित आणि सरकारमान्य उपाय देणे हे आमचे ध्येय आहे. बेकायदेशीर अगरबत्त्या किंवा सिट्रोनेला स्टिक्ससारख्या उत्पादनांपासून दूर राहावे.”
मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलच्या संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. कीर्ती सबनीस यांनीही चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “आता डेंग्यू व मलेरिया वर्षभर सक्रिय होत आहेत. वाढते शहरीकरण, हवामान बदल आणि जागतिक प्रवास यामुळे धोका वाढत चालला आहे. पारंपरिक उपाय पुरेसे राहिलेले नाहीत, त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे.”
गुडनाइटने अलीकडेच रेनोफ्लुथ्रिन या भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित व पेटंटेड रेणूवर आधारित गुडनाइट फ्लॅश लिक्विड व्हेपोरायझर सादर केला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, हे उत्पादन विद्यमान फॉर्म्युलेशनपेक्षा दुप्पट प्रभावी असून डासांपासून अधिक सुरक्षित आणि मजबूत संरक्षण देते.
डेंग्यू आणि मलेरियाचा धोका आता पावसाळ्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. भारतीय समाजात वर्षभर प्रतिबंधात्मक उपायांची गरज वाढत आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
