पुणे, 25 ऑगस्ट (हिं.स.)। वडगाव मावळ, तसेच सातारा, रायगड जिल्ह्यात गंभीर गुन्हे करणारा गुंड किरण मोहितेसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिले.
किरण एकनाथ मोहिते (वय २९, रा. व्हिजन वुडस, जांभुळ ता. मावळ), एकनाथ अर्जुन मोहिते (वय ५३ रा. जांभुळ ता. मावळ) रवींद्र लक्ष्मण मोहिते (वय ३३ रा. कुडेवाडा, वडगाव मावळ), मयूर ऊर्फ चण्या बजरंग मोढवे (वय २६, रा. ढोरेवाडा, वडगाव मावळ ) करण रमेश पवार (वय २५, रा. टाकवे बुदुक, ता. मावळ ) सुशांत अनिल साबळे (वय २४, रा. केशवनगर, वडगाव मावळ) अशी मकोका कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
टोळीप्रमुख किरण मोहिते पसार असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. मोहिते टोळीविरुद्ध वडगाव मावळसह पुणे ग्रामीण, सातारा, रायगड जिल्ह्यामध्ये दहशत माजविली होती. मारामारी करणे, खूनाचा प्रयत्न करणे, खंडणी उकळणे, जबरी चोरी करणे, डॉक्टरांवर हल्ला करणे, कट करुन खंडणी मिळवण्यासाठी खूनाचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न करणे असे 9 गुन्हे दाखल आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
