
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। शाओमीच्या सब-ब्रँड रेडमीने आपली नवी फ्लॅगशिप स्मार्टफोन मालिका रेडमी के 90 आणि रेडमी के 90 प्रो मॅक्स चीनमध्ये अधिकृतपणे लॉन्च केली आहे. दोन्ही मॉडेल्स आकर्षक डिझाइन, उच्च कार्यक्षम चिपसेट आणि शक्तिशाली बॅटरीसह सादर करण्यात आले आहेत. रेडमी के 90 प्रो मॅक्स हा या मालिकेतील प्रमुख मॉडेल असून त्यात स्नॅपड्रॅगन 8 एलीट जन 5 चिपसेट देण्यात आला आहे. हा 3nm प्रक्रियेवर आधारित असून यासोबत कंपनीचा खास D2 डिस्प्ले चिप देखील आहे. फोनमध्ये 6.9-इंचाचा OLED डिस्प्ले असून याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 480Hz आहे. डिस्प्ले HDR10+, डॉल्बी व्हिजन आणि DCI-P3 कलर गॅमटसह 3500 निट्स पीक ब्राइटनेस देतो. वेट टच 2.0 सपोर्टसह हा स्क्रीन ओलसर अवस्थेतही कार्यक्षम राहतो. या फोनमध्ये 16GB पर्यंत LPDDR5x RAM आणि 1TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेज मिळते. आवाजाच्या बाबतीत रेडमीने बोससोबत भागीदारी करत 2.1 ट्रिपल-स्पीकर सिस्टीम दिली आहे ज्यात दोन स्टिरिओ स्पीकर्स आणि एक वूफर आहे. फोटोग्राफीसाठी 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर OISसह, 50-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स 5x ऑप्टिकल झूमसह आणि 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स देण्यात आला आहे. फ्रंटला 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा असून दोन्ही कॅमेरे 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी सक्षम आहेत. बॅटरी विभागात, रेडमी के 90 प्रो मॅक्समध्ये 7,560mAh क्षमतेची बॅटरी आहे जी 100W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच 22.5W रिव्हर्स चार्जिंगही शक्य आहे. फिंगरप्रिंट सेन्सर डिस्प्लेअंतर्गत असून कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.4, NFC आणि नेव्हिगेशनसाठी NavIC सपोर्ट दिला आहे. हा फोन सुमारे 218 ग्रॅम वजनाचा आणि 7.9mm जाडीचा आहे. दुसरीकडे, रेडमी के 90 मॉडेलमध्ये 6.59-इंचाचा OLED डिस्प्ले असून रिझोल्यूशन 1156×2510 पिक्सेल आहे. या फोनमध्ये मागील वर्षीचा स्नॅपड्रॅगन 8 एलीट चिपसेट वापरण्यात आला आहे. हा फोन 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50MP प्रायमरी लेन्स, 50MP टेलिफोटो आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहेत. फ्रंटला 20MP कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमी के 90 मध्ये 7,100mAh बॅटरी असून 100W फास्ट चार्जिंग आणि 22.5W रिव्हर्स चार्जिंगचा सपोर्ट आहे. या दोन्ही फोनमध्ये Android 16 आधारित HyperOS 3 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. किंमतीबाबत, रेडमी के 90 प्रो मॅक्सची सुरुवातीची किंमत 3,999 युआन (सुमारे रु. 49,000) असून टॉप मॉडेल 5,299 युआन (सुमारे रु. 65,000) पर्यंत जाते. रेडमी K90 ची किंमत 2,599 युआन (सुमारे रु. 32,000) पासून सुरू होते. रेडमी के 90 प्रो मॅक्स डेनिम, गोल्डन व्हाइट आणि ब्लॅक रंगांत तर के 90 मॉडेल व्हाईट, ब्लॅक, अॅक्वा ब्ल्यू आणि लाईट पर्पल रंगांमध्ये उपलब्ध होईल. दोन्ही मॉडेल्स चीनमधील रेडमीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध राहतील.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
