आपली संस्कृती ही गो-संस्कृती आहे. भारतीय समाजाने गाईला माता मानले आहे. तिलम् न धान्यम् , पशुव: न गाव: म्हणजे तीळ हे धान्य नाही आणि गाय हा पशु नाही. गाईचे महत्व समुद्रमंथनात दडले आहे.
समुद्रमंथन केल्यावर चौदारत्ने प्रकट झाली. या चौदा रत्नांमध्ये तीन रत्न प्राण्याच्या रूपातली आहेत. प्राणी स्वरूपातले पहिले रत्न म्हणजे सफेद वर्णाचा ऐरावत हत्ती. दुसरे रत्न म्हणजे सातमुखांचा ऐरावत घोडा. तिसरे रत्न म्हणजे कामधेनुरूपी पाच गोमातांची प्राप्ती. या पाच गोमातांची नावे पुढीलप्रमाणे
१. नंदा २. सुभद्रा ३. सुरभी
४. सुशीला ५. बहुला
या पाच गाईंच्या रक्षणाचे आणि पालन पोषणाचे दायित्व पाच ऋषींनी स्वीकारले. ते पाच ऋषी म्हणजे जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ, असित आणि गौतम.
भगवान शंकराचे वाहन नंदी आहे. भगवान आदिनाथ म्हणजे ऋषभ देवांचे प्रतीक, चिन्ह वृषभ म्हणजेच बैल आहे. भगवान दत्तात्रय आणि गोपाळकृष्ण या दोन्ही देवतांच्या बरोबर गाय असते. दुर्गामातेच्या नऊ रूपांपैकी शैलपुत्री आणि गौरी मातेचे वाहन गाय आहे. वैतरणा नदी पार करायची असेल तर तिचेही माध्यम गाय आहे.
उत्खननात सापडलेल्या प्राचीन काळातल्या शिक्यांवर बैल किंवा नंदी यांची आकृती कोरलेली आढळते. गोपाष्टमी, वसुबारस, दिवाळी यासारख्या धार्मिक उत्सवांमध्ये गोवंशाची पूजा केली जाते, आराधना केली जाते. या गोष्टी भारतीय संस्कृतीत गोवंशाला असलेले महत्त्व स्पष्ट करतात.
गाईचे वैशिष्ट्य असे की गाय जेव्हा चारा खाते त्या वेळेला ती केवळ पानांचे भक्षण करते. ज्यामुळे मुळांचे संरक्षण होते. म्हणूनच गोचर हा शब्द जो आपल्या भाषेत समाविष्ट करण्यात आला त्याचा संबंध गाईच्या चरण्याशी आहे.
आपल्या संस्कृतितले यज्ञकर्म हे गाईच्या तुपावर अवलंबून आहे. गाईच्या शेणाचे म्हणजेच गोमयाचे लेपन करूनच यज्ञाचे स्थान पवित्र केले जाते.
यक्षाने युधिष्ठराला विचारले अमृत काय आहे?
युधिष्ठराने तत्काळ उत्तर दिले गाईचे दूध हेच अमृत आहे.
भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायात वैश्यांचा स्वाभाविक धर्म सांगताना म्हटले आहे
कृषिगौरक्ष्यविणिज्यं,
वैश्यकर्म स्वभावजम् ।
याचा अर्थ शेती करणे, गौरक्ष्य म्हणजे गुराढोरे पाळणे, हा वैशांचा स्वाभाविक व्यवसाय आहे.
शेतीप्रधान असलेला आपला देश आहे. गुराढोरांचे महत्त्व जाणणारी आपली संस्कृती आहे. धन आणि धान्य प्राप्त करून देणाऱ्या गोवंशाविषयी कृतज्ञता भाव जतन करणारा संस्कार भारतीय संस्कृती करते.
पावसाळ्यामध्ये शेतात कष्ट करून धान्य पिकवले आहे. हे धान्य पिकवण्यासाठी गोवंशाने माणसाला सहकार्य केले आहे. म्हणूनच या दीपोत्सवाच्या आरंभी गाईचा तिच्या वत्सासह म्हणजेच तिच्या वंशासह तिचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. गोवंशाविषयी कृतज्ञता भाव जागा राहावा म्हणूनच वसुबारस हा सण दीपोत्सवाच्या आरंभाचा पहिला दिवस! धनधान्याने समृद्ध असल्यावाचून दीपोत्सव साजरा करता येत नाही. म्हणूनच गोवंशा विषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे, ती आजच्या दिवशी. याचे भान आपल्याला सदैव असले पाहिजे.
– दुर्गेश जयवंत परुळकर
व्याख्याते आणि लेखक
९८३३१०६८१२
हिंदुस्थान समाचार
