मानव समाजाचा विकास केवळ तांत्रिक
प्रगतीवर,
औद्योगिक उन्नतीवर
किंवा भौतिक सुखसुविधांच्या उपलब्धतेवर होत नाही, तर त्यामागे एक महत्त्वाचा पाया असतो
आणि तो म्हणजे स्वच्छता
होय.
स्वच्छतेशिवाय
आरोग्य,
आरोग्याशिवाय
श्रमशक्ती,
श्रमशक्तीशिवाय
उत्पादन आणि उत्पादनाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे. म्हणूनच इतिहासापासून आधुनिक
काळापर्यंत जगातील सर्व समाजांमध्ये स्वच्छतेला सामाजिक मूल्य, नैतिक कर्तव्य आणि
सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग मानले गेले आहे. मात्र विसाव्या शतकानंतर
झालेल्या औद्योगिकीकरणाने,
वेगवान शहरीकरणाने
आणि उपभोक्तावादी संस्कृतीने जगासमोर कचऱ्याचे व्यवस्थापन, पाण्याचे प्रदूषण, वायुप्रदूषण आणि
जमिनीची धोकादायक नासाडी असे प्रश्न उभे केले आहेत. याच पार्श्वभूमीवर संयुक्त
राष्ट्र महासभेने दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी ठराव क्र. A/RES/78/122 मंजूर करून दरवर्षी २० सप्टेंबर हा जागतिक स्वच्छता दिन म्हणून
पाळण्याचा निर्णय घेतला.
जागतिक
स्वच्छता दिन
हा दिवस फक्त कचरा गोळा करण्याचा दिवस नाही, तर तो समाजातील प्रत्येक घटकाला, प्रत्येक नागरिकाला
आणि प्रत्येक राष्ट्राला सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देतो. स्वच्छता ही
आरोग्याची पायरी आहे,
परंतु तिच्या पुढे
सामाजिक न्याय,
समता, पर्यावरणीय संरक्षण
आणि आर्थिक समृद्धीचेही आयाम दडलेले आहेत. त्यामुळेच या दिवसाचे समाजशास्त्रीय
महत्त्व अधोरेखित होते.
स्वच्छतेचा समाजशास्त्रीय अभ्यास केला, तर दिसते की
समाजातील वेगवेगळ्या गटांमध्ये स्वच्छतेच्या संकल्पना भिन्न असतात. ग्रामीण
समाजातील लोक स्वच्छतेला पारंपरिक परंपरांशी जोडतात, जसे की दररोज अंगण झाडणे, शौचालयात जाऊन आल्यानंतर
हातपाय धुणे,
घरातील पवित्रता
राखणे. शहरी समाज मात्र आधुनिक साधनसामग्रीच्या मदतीने कचरा व्यवस्थापन करतो, परंतु प्लास्टिकच्या
अतिरेकी वापरामुळे शहरातील प्रदूषणाची समस्या अधिक तीव्र झाली आहे. एका गटाची
अस्वच्छता दुसऱ्या गटावर आघात करते, उदा.
शहरातील नाले गावाकडे वाहून जातात आणि तेथील पिण्याचे पाणी दूषित करतात. यावरून
स्वच्छतेचा प्रश्न केवळ वैयक्तिक नसून सामूहिक आहे, हे स्पष्ट होते.
समाजातील असमानता आणि स्वच्छता यांचे
नातेही महत्त्वाचे आहे. गरीब वस्त्यांमध्ये राहणारे लोक सुरक्षित, स्वच्छ पाणी व
शौचालयाच्या सुविधांपासून वंचित असतात. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांवर त्यांना
मोठा खर्च करावा लागतो,
परिणामी दारिद्र्य
अधिक वाढते. उलट,
सधन वर्ग
आरोग्यसुविधा परवडल्यामुळे या संकटापासून वाचतो. म्हणूनच स्वच्छतेचा प्रश्न हा
सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. जागतिक स्वच्छता दिन या असमानतेकडे जगाचे लक्ष वेधतो
आणि सर्वांना समान आरोग्यदायी वातावरण मिळवून देण्याचे आवाहन करतो.
आरोग्य आणि स्वच्छतेचे नाते तर
अविभाज्यच आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी लाखो लोक दूषित पाणी आणि
अस्वच्छतेमुळे होणाऱ्या रोगांमुळे मृत्यूमुखी पडतात. भारतातही डेंग्यू, मलेरिया, कॉलरा अशा साथरोगांचा
प्रसार अस्वच्छतेमुळे होतो. भारतात ‘स्वच्छ
भारत अभियान’ या राष्ट्रीय
उपक्रमाने खुले शौचालय निर्मूलन आणि कचरा व्यवस्थापनात लक्षणीय प्रगती साधली असली, तरीही भारतीय
लोकांच्या मानसिकतेत बदल घडवण्याचे कार्य अद्याप अपूर्ण आहे. स्वच्छतेला जीवनशैलीत
सामावून घेणे ही खरी आवश्यकता आहे.
पर्यावरणीय दृष्टिकोनातून पाहिले, तर कचरा
व्यवस्थापनाचा प्रश्न जगासमोर भयानक रूपात उभा आहे. प्लास्टिकच्या प्रदूषणाने
समुद्री प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. औद्योगिक सांडपाण्यामुळे नद्या आणि
तलावांचे पाणी विषारी झाले आहे. जंगलात पडणाऱ्या घनकचर्यामुळे जैवविविधता नष्ट
होत आहे. हवामान बदलाचे वेगाने वाढणारे प्रमाणही कचरा व्यवस्थापनातील त्रुटींशी
निगडित आहे. अशा परिस्थितीत जागतिक स्वच्छता दिन हा केवळ स्वच्छतेचा नव्हे, तर पर्यावरण
वाचविण्याचा दिवस म्हणून पाहिला पाहिजे.
स्वच्छतेचा आर्थिक परिणाम देखील तितकाच
महत्त्वाचा आहे. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांवर मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक व
खाजगी खर्च होतो. कामगारशक्ती आजारी पडल्यामुळे उत्पादनक्षमता घटते. पर्यटनाच्या
दृष्टीने स्वच्छ शहरं व खेडी हे नेहमीच आकर्षण ठरतात. स्वच्छता राखणारी गावे व
जिल्हे हे विकासाच्या दिशेने वेगाने प्रगती करतात. म्हणूनच आर्थिक प्रगतीसाठी
स्वच्छतेचे भांडवल म्हणून पाहिले पाहिजे.
संस्कृती आणि स्वच्छता यांचे नाते
भारतीय समाजासाठी विशेष आहे. आपल्या धार्मिक परंपरांमध्ये स्वच्छतेला पवित्रतेचे
रूप दिले गेले आहे. धार्मिक स्थळे, घरे, अंगणे स्वच्छ ठेवणे
हे धार्मिक कर्तव्य मानले गेले. परंतु आज या परंपरांचा लोप होत आहे. उत्सवांमध्ये
निर्माल्य,
प्लास्टिक सजावट
यामुळे नद्या व तळी प्रदूषित होतात. त्यामुळे स्वच्छतेची खरी परंपरा नव्या पिढीला
समजावून सांगणे व ती आधुनिक जीवनशैलीशी जुळवून घेणे अत्यावश्यक आहे.
स्वच्छतेची खरी चळवळ लोकसहभागातूनच
यशस्वी होऊ शकते. सरकारने कितीही योजना आखल्या तरी नागरिकांचा सहभाग नसेल, तर त्या योजनांना यश
मिळणे कठीण आहे. शाळांमधील विद्यार्थी, महाविद्यालयीन
युवक,
महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, स्थानिक ग्रामपंचायती
या सर्वांचा सहभाग स्वच्छता चळवळीला उर्जा देतो. त्याचबरोबर कचरा गोळा करणाऱ्या
कामगारांचे योगदान विसरून चालणार नाही. त्यांच्या श्रमांमुळेच शहरं व गावं स्वच्छ
राहतात. त्यांना सामाजिक सन्मान व सुरक्षितता देणे ही समाजाची जबाबदारी आहे.
स्वच्छतेचा प्रश्न हा जागतिक विकास
उद्दिष्टांशी थेट संबंधित आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलेले आणि १जानेवारी २०१६रोजी लागू केलेले १७ शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) स्वच्छतेशिवाय साध्य होऊ शकत नाहीत. ही उद्दिष्टे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय स्थिरता साधण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन
स्वीकारतात.
गरिबी निर्मूलन,
चांगले आरोग्य, लिंगसमता, शाश्वत शहरे, हवामान कृती, स्वच्छ पाणी व
स्वच्छता या सर्व ध्येयांचा पाया स्वच्छतेवरच आहे. त्यामुळे जागतिक स्वच्छता दिन
हा प्रत्यक्षात शाश्वत विकासाच्या अजेंड्याला गती देणारा दिवस आहे.
या सर्व विवेचनावरून असे स्पष्ट होते की
जागतिक स्वच्छता दिन हा फक्त एका दिवसापुरता प्रतीकात्मक कार्यक्रम नाही, तर तो सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि
सांस्कृतिक बदल घडवण्याचे साधन आहे. २० सप्टेंबरचा हा दिवस प्रत्येकाला स्वतःच्या
जबाबदाऱ्यांची आठवण करून देतो. आपल्या घरापासून ते शाळा, रस्ते, समाज, गाव, शहर आणि शेवटी राष्ट्र व जग या सर्व
स्तरांवर स्वच्छतेची चळवळ रुजली,
तरच समाज परिवर्तन
शक्य आहे.
आज गरज आहे ती केवळ कचरा उचलण्याची नाही, तर मानसिकतेत बदल
घडवण्याची. ‘माझ्या एका कृतीने काय फरक पडणार?’ ही संकुचित मानसिकता मोडून ‘मी बदललो
तर समाज बदलेल’ ही जाणीव मनोमन स्वीकारणे ही खरी स्वच्छतेची सुरुवात आहे. जागतिक
स्वच्छता दिन हाच संदेश देतो की स्वच्छता ही व्यक्तीगत सवय नसून सामूहिक संस्कृती
आहे.
शेवटी, जागतिक
स्वच्छता दिन आपल्याला सांगतो की स्वच्छता म्हणजे आरोग्य, पर्यावरण, अर्थकारण,
सामाजिक समता आणि
सांस्कृतिक मूल्ये यांचा संगम आहे. २० सप्टेंबरचा हा दिवस आपण सर्वांनी सामूहिक
जबाबदारीचा दिवस म्हणून पाळला, तर तो
समाजपरिवर्तनाचा पाया ठरेल. प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेला जीवनशैलीत सामावून
घेतले, तरच हा दिवस खऱ्या
अर्थाने यशस्वी ठरेल.
डॉ. राजेंद्र बगाटे, (लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत)
मो. क्र. ९९६०१०३५८२, ईमेल – bagate.rajendra5@gmail.com
—————
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी
