मुंबई, 9 नोव्हेंबर (हिं.स.) मुंबईतील अग्रगण्य शैक्षणिक संस्था आणि नवोदित क्रीडापटूं घडवणारे एक भक्कम केंद्र असलेल्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्थेच्या खेळाडूंनी गोवा येथे सुरू असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल 13 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. या खेळाडूंनी मल्लखांब आणि अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सशी संबंधित विविध प्रकारांतर्गत सर्वोत्तम कामगिरी करताना छाप पाडली.
रूपाली गंगावणे हिने मल्लखांब प्रकारातील वैयक्तिक श्रेणींमध्ये (कॅटेगरी) ४ सुवर्णपदके जिंकली. अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्समधील महिला गटातील विजेत्यांमध्ये सोनाली बोराडे, अक्षता ढोकळे आणि अर्ना पाटील यांचा समावेश आहे. ऋतुजा जगदाळे आणि प्रीती एखंडे यांनी महिलांच्या पेअर (जोडी) प्रकारात तर आचल गुरव आणि आशुतोष रेणावकर यांनी मिक्स पेअर प्रकारात प्रत्येकी दोन सुवर्णपदके जिंकली. पुरुषांच्या पेअर प्रकारात आकाश गोसावी आणि आदित्य खसासे यांनी 2
सुवर्णपदकांची कमाई केली तर पुरुष गटातील वरिष्ठ (सीनियर) प्रकारात कुणाल कोठेकर, रितेश बोराडे, प्रशांत गोरे आणि नमन महावर यांनी चौथे स्थान मिळविले.
राष्ट्रीय स्पर्धेतील सर्व खेळाडूंना राहुल ससाणे, सुनील गंगावणे, योगेश पवार, सुनील रणपिसे आणि रमेश सकट यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण लाभले. या प्रशिक्षकांनी सर्वोत्तम कोचिंग देण्यासाठी खूप मेहनत घेतली. काही खेळाडूंची कोचिंग फी न घेता ट्रेनिंग दिली.
यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कामगिरी ही लोकमान्य शिक्षण संस्थेच्या खेळाडूंची देशांतर्गत आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या महिन्यात ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे झालेल्या 13व्या ज्युनियर आणि सीनियर
अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स आशियाई स्पर्धेत अॅक्रोबॅटिक्स जिमनॅस्टिक्स या प्रकारात 3 सुवर्ण 2 रौप्य व 8 कांस्य असे एकूण 13 पदके जिंकली होती.
हिंदुस्थान समाचार
