नागपूर, 06 ऑक्टोबर (हिं.स.) : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचे आणखी एक प्रकरण उजेडात आलेय. सीमाशुल्क विभागाने आज, शुक्रवारी विमानतळावर एक महिलेला 72 लाखांच्या सोन्यासह अटक केलीय.
नागपूर कस्टम्सच्या एअर कस्टम्स यूनिट आणि एअर इंटेलिजन्स यूनिटच्या टीमने मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत महिला प्रवाशाची तपासणी केली असता बेल्टमध्ये पेस्ट स्वरूपात सोने लपवल्याचे आढळून आले. भारतीय पासपोर्ट धारक ही महिला प्रवासी शारजाहून नागपूरला एअर अरेबिया फ्लाइट क्र. जी-9415 ने प्रवास करीत होती. अधिकाऱ्यांना या महिलेची हालचाल संशयास्पद वाटली. त्यानंतर तिला थांबवून तिची तपासणी केली असता. महिलेने घातलेल्या बेल्टमध्ये 24 कॅरेटचे 1 किलो 270 ग्राम सोने आढळून आले. या सोन्याचे मूल्य 72 लाख 29 हजार रुपये आहे. सीमा शुल्क विभागाने हे सोने जप्त करून आरोपी महिलेला अटक केलीय.
सीमाशुल्क आयुक्त संजय कुमार यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त धैर्यशील कणसे आणि पीयूष भाटी यांच्या मार्गदर्शनाखाली सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
हिंदुस्थान समाचार
