पुणे, 6 ऑक्टोबर , (हिं.स) पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सध्या विविध विकासाभिमूख कामे सुरु आहेत. या कामांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मोठा हातभार लागणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये भाजपाचे योगदान आहे. यामुळेच विकसित शहराला अजून ‘स्मार्ट’ बनविण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक कार्यवाही करावी, अशा सूचना भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केल्या.चिंचवड विधानसभा मतदार संघासह शहरातील कामांना गती यावी व तसेच नवीन प्रकल्प शहरात साकारले जावेत. यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनामध्ये भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने बैठक घेण्यात आली.यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक सागर आंघोळकर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांची भेट घेताना विकासात्मक कामांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी पिंपळे गुरव येथील व्हिलेज प्लाझा हा प्रकल्प, प्रकल्प विभागाच्या वतीने राबविणे, पिंपळे निलख येथील रक्षक चौकात ग्रेड सेपरेटरच्या बरोबरीने भूयारी मार्गाची निर्मिती करणे, पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटीसमोर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रकल्पांची चाचपणी करणे, वाल्हेकरवाडी डांगे चौकातील पशुसंवर्धन येथील जागेपासून डांगे चौकाला जोडणारा पूल तयार करणे, सांगवी फाटा येथे नागरिकांसाठी पादचारी पुलाची निर्मिती करणे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची अद्ययावत इमारत चिंचवड येथील ‘एम्पायर इस्टेट’ येथे प्रस्तावित करणे, काळेवाडी कुणाल हॉटेल चौक -चिंचवड दरम्यान केशवनगर पुलापर्यंत ‘एलीव्हेटेड’ पुलाची निर्मिती करणे अशी नवी कामे ‘प्रकल्प विभागा’साठी प्रस्तावित करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार
