नवी दिल्ली, 31 डिसेंबर (हिं.स.) – आगामी 2024 या नववर्षासाठी ‘निरोगी राहा, तंदुरुस्त राहा’, हा संकल्प करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले. मन की बात’ भाग 108 व्या भागात ते बोलत होते. या नवीन वर्षात आपण सर्वजण यशाच्या नव्या उंचीवर पोहोचावे, सर्वांनी निरोगी राहावे, तंदुरुस्त राहावे, अत्यंत आनंदी राहावे – हीच माझी प्रार्थना आहे. वर्ष 2024 मध्ये आपण पुन्हा एकदा देशवासीयांच्या नव्या यशोगाथांबद्दल बोलू या, असेही मोदी म्हणाले.
भारताचे यश हे प्रत्येक भारतीयाचे यश
ते पुढे म्हणाले, 2024 उजाडायला आता काहीच तास बाकी उरले आहेत. भारताचे यश हे प्रत्येक भारतीयाचे यश आहे. आपल्याला पंच निर्धारांचे स्मरण ठेवून भारताच्या विकासासाठी निरंतर प्रयत्न करत राहायचे आहे. आपण कोणतेही काम करताना, कोणताही निर्णय घेताना, आपला पहिला निकष हाच असला पाहिजे की यातून देशाला काय मिळणार, देशाला कोणता लाभ होणार. सर्वप्रथम देश – नेशन फर्स्ट यापेक्षा मोठा कोणताही मंत्र नाही. याच मंत्राच्या आधाराने वाटचाल करत आपण सर्व भारतीय, आपल्या देशाला विकसित करणार आहोत, आत्मनिर्भर बनवणार आहोत.
108 हा आकडा अपार श्रद्धेशी निगडीत
‘मन की बात’ म्हणजे तुम्हां सगळ्यांना भेटण्याची एक शुभ संधीच, आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबियांना भेटतो तो क्षण खूपच आनंददायी आणि समाधानकारक असतो. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा मला देखील हाच अनुभव येतो, आणि आज आपल्या एकत्रित प्रवासाचा हा 108 वा भाग आहे. आपल्याकडे 108 या अंकाचे महत्व, त्याचे पावित्र्य हा एक सखोल अध्ययनाचा विषय आहे. जपमाळेतील 108 मणी, 108 वेळा होणारा जप, 108 दिव्य क्षेत्र, मंदिरांच्या 108 पायऱ्या, 108 घंटा, 108 हा आकडा अपार श्रद्धेशी निगडीत आहे. म्हणूनच ‘मन की बात’ चा हा 108 वा भाग माझ्यासाठी अजूनच खास झाला आहे. या 108 भागांमध्ये आपण लोकसहभागाची अनेक उदाहरणे पहिली आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आता या टप्प्यावर पोहोचल्यानंतर, आपल्याला नवीन जोमाने, नवीन उर्जेसह आणि अधिक वेगाने आगेकूच करण्याचा संकल्प केला पाहिजे. उद्याचा सूर्योदय हा 2024 चा पहिला सूर्योदय असणार आहे हा किती सुखद योगायोग आहे; आपण 2024 मध्ये प्रवेश केला असेल. तुम्हां सर्वांना 2024 च्या हार्दिक शुभेच्छा.
सरत्या वर्षी अनेक विशेष कामगिरी पार पाडल्या!
‘मन की बात’ ऐकणाऱ्या अनेक श्रोत्यांनी मला पत्राद्वारे त्यांचे अविस्मरणीय क्षण लिहून पाठविले आहेत. आपल्या देशाने यावर्षी अनेक विशेष कामगिरी पार पाडल्या आहेत, ही या 140 कोटी लोकांची ताकदच आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणारा ‘नारी शक्ती वंदन कायदा’ यावर्षी मंजूर झाला. भारत सर्वात मोठी 5 वी अर्थव्यवस्था झाल्याबद्दल अनेकांनी पत्र लिहून आपला आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी मला G20 परिषदेच्या यशाची देखील आठवण करून दिली आहे. मित्रांनो, आज भारतातील प्रत्येक कानाकोपरा आत्मविश्वासाने भरलेला आहे, विकसित भारताच्या भावनेने, आत्मनिर्भरतेच्या भावनेने भारावलेला आहे. वर्ष 2024 मध्ये देखील आपल्याला हीच भावना आणि चालना कायम ठेवायची आहे. प्रत्येक भारतीय हा ‘व्होकल फॉर लोकल’ या मंत्राला महत्व देत आहे हे दिवाळीतील विक्रमी व्यवसायाने सिद्ध केले आहे.
आजही मला अनेक लोकं चांद्रयान 3 च्या यशाबद्दल संदेश पाठवत आहेत. मला विश्वास आहे की, माझ्याप्रमाणेच तुम्हांला देखील आपल्या शास्त्रज्ञांचा आणि विशेषतः महिला शास्त्रज्ञांचा विशेष अभिमान वाटत असेल. जेव्हा जेव्हा आपण एकत्रित प्रयत्न केले, तेव्हा त्याचा आपल्या देशाच्या विकासच्या वाटचालीवर खूपच सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमा आपण यशस्वी होताना पाहिल्या आहेत. यामध्ये करोडो लोकांच्या सहभागाचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. 70 हजार अमृत तलावांचे निर्माण हे देखील आमचे सामूहिक यश आहे.
जो देश नाविन्याला महत्त्व देत नाही त्याचा विकास थांबतो!
जो देश नाविन्याला महत्त्व देत नाही त्याचा विकास थांबतो यावर माझा विश्वास आहे. भारताचे इनोव्हेशन हब हे याचेच प्रतीक आहे की आपण आता कधीच थांबणार नाही. 2015 मध्ये आम्ही ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये 81 व्या क्रमांकावर होतो – आज आमचा क्रमांक 40 आहे. या वर्षी, भारतात दाखल केलेल्या पेटंटची संख्या जास्त आहे, त्यापैकी सुमारे 60% हे देशांतर्गत निधी तून उभे राहिले होते. यावेळी QS आशिया विद्यापीठ क्रमवारीत सर्वाधिक भारतीय विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे. या यशांची यादी ही न संपणारी आहे. भारताची क्षमता किती प्रभावशाली आहे ही याची केवळ एक झलक आहे – देशाच्या या यशातून, देशातील जनतेच्या या कामगिरीपासून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे, त्यांचा अभिमान बाळगायचा आहे, नवे संकल्प करायचे आहेत.
भारताच्या विकासाचा सर्वाधिक फायदा तरुणांनाच होणार!
आता आपण भारताबद्दल सर्वत्र असलेल्या आशा आणि उत्साहाविषयी चर्चा केली – ही आशा आणि अपेक्षा खूप चांगली आहे. भारताच्या विकासाचा सर्वाधिक फायदा तरुणांनाच होणार आहे; पण देशातील तरुण जेव्हा सुदृढ असतील तेव्हाच याचा अधिक फायदा तरुणांना होईल. आजकाल जीवनशैलीशी निगडित आजारांबद्दल चर्चा होताना आपण अनेकदा पाहिले आहे. ही आपल्या सर्वांसाठी, विशेषतः तरुणांसाठी चिंतेची बाब आहे. या ‘मन की बात’साठी मी तुम्हा सर्वांना फिट इंडियाशी संबंधित तुमचा अभिप्राय पाठवण्याची विनंती केली होती. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाने माझ्यात उत्साह संचारला आहे. नमो अॅपवर मलामोठ्या संख्येने स्टार्टअप्सनीही त्यांच्या सूचना पाठवल्या आहेत, त्यांनी त्यांच्या अनेक अनोख्या प्रयत्नांची चर्चा केली आहे.
तंदुरुस्तीसाठी काय चांगलं, काय वाईट, समजून घेणे अत्यंत गरजेचे! – अक्षय कुमार
मी अक्षय कुमार. सर्वप्रथम मी आपले आदरणीय पंतप्रधानांचे आभार माणू इच्छितो की, त्यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात मला देखील माझ्या ‘मनातील गोष्ट’ तुम्हाला सांगण्याची एक छोटीशी संधी मिळाली आहे. तुम्हां सर्वांना माहितच आहे की तंदुरुस्तीची मला जितकी आवड आहे, त्याहून कितीतरी अधिक आवड नैसर्गिक पद्धतीने तंदुरुस्त राहण्याची आहे. मला या भपकेदार व्यायामशाळा अजिबात आवडत नाहीत. त्यापेक्षा मला मोकळ्यावर पोहायला, बॅडमिंटन खेळायला, पायऱ्या चढायला, मुदगल घेऊन व्यायाम करायला, चांगले आरोग्यपूर्ण जेवण जेवायला अधिक आवडते. बघा, मला असं वाटतं की शुध्द तूप जर योग्य प्रमाणात खाल्ले तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. पण मी बघतो की बरेचसे तरुण केवळ जाड होण्याच्या भीतीने तूप खात नाहीत. आपल्या तंदुरुस्तीसाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे आपण समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही तुमची जीवनशैली डॉक्टरांच्या सल्ल्याने बदला, एखाद्या अभिनेत्याची शरीरयष्टी पाहून तसे करू नका. अभिनेते जसे पडद्यावर दिसतात तसे ते अनेकदा प्रत्यक्षात असत नाहीत. चित्रपटात अनेक प्रकारचे फिल्टर आणि स्पेशल इफेक्ट्स यांचा वापर करण्यात येतो आणि आपण पडद्यावर जे दिसते त्यानुसार आपले शरीर घडवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने शॉर्टकटचा वापर करू लागतो. आजकाल खूप लोक स्टिरॉईड्सचे सेवन करून सिक्स पॅक, एट पॅक यांच्या मागे लागतात.
अशा शॉर्टकट्सचा वापर केल्यावर शरीर बाहेरून वाढलेले दिसते मात्र आतून पोकळच राहते. तुम्ही सर्वांनी हे नेहमी लक्षात ठेवा की शॉर्टकट तुमचे आयुष्य कमी करू शकतात. तुम्हाला शॉर्टकट नव्हे तर दीर्घकाळ टिकणारी तंदुरुस्ती हवी आहे.मित्रांनो, तंदुरुस्ती एक तपस्या आहे. ती काही इंस्टंट कॉफी किंवा दोन मिनिटात तयार होणारे नूडल्स नव्हे. म्हणून नव्या वर्षात स्वतःला वचन द्या, रसायने वापरायची नाहीत,शॉर्टकट्स वापरायचे नाहीत. व्यायाम, योग, चांगले अन्न, वेळेवर झोप, थोडे मेडिटेशन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जसे तुम्ही आहात तसे आनंदाने स्वीकारा. आजपासून फिल्टर असलेले जीवन नव्हे तर अधिक तंदुरुस्त जीवन जागा. काळजी घ्या. जय महाकाल.
हिंदुस्थान समाचार
