डोंबिवली, १५ जानेवारी (हिं.स.) : डोंबिवलीतील महात्मा फुले रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये चोरीचा प्रयत्न झाला. चोरटे गॅस कटरचा वापर करत असताना एटीएममधील २१ लाखाची रोकड जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
पश्चिमेतील महात्मा फुलेरोडवरील साई बाबा चौकात स्टेट बँक आफ इंडियाचे एटीएम आहे. मध्यरात्री चोरट्यांनी या एटीएममध्ये प्रवेश केला. त्यांच्याकडून एटीएम फुटत नसल्याने त्यांनी त्यांच्याजवळील गॅस कटरचा वापर सुरु केला. गॅस कटरने मशीन कट करीत असताना गॅसमुळे मशीनला आग लागली. या आगीत मशीनमधील २१ लाख ११ हजार ८०० रुपयांची रोकड संपूर्ण जळून खाक झाली. यानंतर चोरट्यांनी चोरी करताना तेथील सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरुन नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हिंदुस्थान समाचार
