पुणे 15 जानेवारी (हिं.स) पुणे बार असोसिएशनच्या (पीबीए) आगामी निवडणुकांसाठी मतपत्रिकांचा वापर करावा, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर देखरेखीसाठी सात सदस्यीय समिती नेमावी, यांसह विविध मुद्यांवर सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव करण्यात आला.निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वकिलांची सर्वसाधारण सभा न्यायालयात पडली. असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षस्थानी होते. माजी अध्यक्ष अॅड. सतीश मुळीक, अॅड. श्रीकांत अगस्ते, अॅड. मिलिंद पवार, अॅड. सुभाष पवार, अॅड. गिरीश शेडगे आदींसह माजी पदाधिकारी व वकील मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.
अॅड. सुप्रिया कोठारी म्हणाल्या, निवडणूक निर्णय अधिकारीही अध्यक्षांच्या मर्जीतील असतात. निवडणुकांमध्ये पारदर्शीपणा येण्यासाठी समिती अस्तित्वात येण्याची गरज आहे. अॅड. हेमंत झंजाड म्हणाले, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह समितीची नेमणूक करावी. जेणेकरून ही समिती निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवेल. असोसिएशनवर निष्पक्ष काम करणारे पदाधिकारी असण्याची आवश्यकता आहे.
हिंदुस्थान समाचार
