भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल, आरोपींना अटक
नाशिक, ११ जानेवारी (हिं.स.) : नाशिक येथे दुकानदारांकडून खंडणीची मागणी करणाऱ्यांना हटकल्यावरून गुंडांनी एका तरुणावर प्राण घातक हल्ला केल्याची घटना घडली. कल्पेश कुलकर्णी असे पिडीताचे नाव असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार फिर्यादी कल्पेश दीपक कुलकर्णी (वय २४, रा. मंगलवर्षा सोसायटी, काठे गल्ली, नाशिक) हे घरी असताना आरोपी सुमित पगारे, विकी ऊर्फ अक्षय झावरे, आकाश पगारे व मुन्ना कासार यांनी संगनमत करून फिर्यादी यांच्या सोसायटीमध्ये पेव्हर ब्लॉक फेकून, तसेच जवळ असलेल्या पान विक्री करणाऱ्या दुकानदारास दुकान चालवायचे असेल, तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, असा दम देऊन त्याच्या दुकानावर दगडफेक केली. याबाबत फिर्यादी कल्पेश कुलकर्णी यांनी उपरोक्त ४ आरोपींना याबाबतजाब विचारला असता त्याचा राग आल्याने या चौघांनी कुलकर्णीवर धारदार हत्याराने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सुमित पगारे, विकी झावरे व आकाश पगारे या आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे करीत आहे.
हिंदुस्थान समाचार
