पुणे, 26 नोव्हेंबर (हिं.स.) आम्ही महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी आहोत,’ असे सांगून महावितरण कंपनीचा विजेचा मीटर बदलून त्याठिकाणी दुसरा खासगी मीटर बसविला. त्यासाठी साडेसात हजार रुपये घेऊन वीज ग्राहकाची व महावितरण कंपनीची फसवणूक व आर्थिक नुकसान केल्याच्या आरोपावरून मंचर पोलिस ठाण्यात गणेश महादेव इंदोरे (रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव) व प्रवीण पाचपुते (रा. जारकरवाडी, ता. आंबेगाव) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.सदर घटना मंचर शहरातील बाजार समितीच्या मागे असलेल्या ढोबीमळा येथे घडली.
या प्रकरणी महावितरण कंपनीचे मंचर विभागाचे सहाय्यक अभियंता संजय बारहाते यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार इंदोरे व पाचपुते यांनी वीज ग्राहक चंदर धरम चव्हाण यांचा विश्वास संपादन केला आणि जादा वीज बिल येणार नाही, असे सांगून त्यांच्या पत्नी अंबिका चंदर चव्हाण यांच्या नावे असलेल्या वीज मीटरची (क्रमांक ४१६०१४६५) विल्हेवाट लावली. तेथे दुसरा वीज मीटर बसविला. नवीन मीटर बसवण्यासाठी साडेसात हजार रुपये रक्कम चव्हाण कुटुंबाकडून त्यांनी घेतली.दरम्यान, शुक्रवारी चव्हाण यांच्या नावे असलेला वीज मीटरची तपासणी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी केली. मात्र, संगणकीय वीज जोडणी प्रणाली होत नव्हती. त्यामुळे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना संशय आला.
हिंदुस्थान समाचार
