रत्नागिरी, 3 फेब्रुवारी, : भारताचे प्रथम राष्ट्रीय विजेते रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केजीएन सरस्वती फाउंडेशनमार्फत आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस आज रत्नागिरीतील राणी लक्ष्मीबाई सभागृहात दिमाखात प्रारंभ झाला.
मूळचे देवरूखचे कै. सप्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रत्नागिरीत २०१३ सालापासून या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. चेसमेन रत्नागिरी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी बुद्धिबळाच्या पटावर प्रतीकात्मक चाली करून स्पर्धेचा शुभारंभ केला.
बुद्धिबळ या खेळाला ग्लॅमर मिळवून दिले पाहिजे. रत्नागिरीतही राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित कराव्यात. रत्नागिरीतून बुद्धिबळाचे राष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत, ही सप्रे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ क्रीडापटू, चेसमेनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर यांनी केले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे, डॉ. श्रीकृष्ण जोशी, ऋचा जोशी, सीए उमेश लोवलेकर व्यासपीठावर प्रमुख होते.
स्पर्धेत मुंबई, सांगली, सतारा, कोल्हापूर, पुणे, गोवा, कर्नाटक येथून एकूण १०८ स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. यापैकी ४० हून अधिक खेळाडू अंतरराष्ट्रीय फिडे गुणांकन प्राप्त खेळाडू असून आयोजकांकडून एकूण एक लाखांची बक्षिसे घोषित करण्यात आली आहेत. सात, नऊ, अकरा, तेरा, पंधरा वर्षांखालील गटासोबतच सर्वोत्कृष्ट वरिष्ठ आणि दिव्यांग खेळाडूंना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून विवेक सोहानी, चैतन्य भिडे यांच्यासोबत दीपक वायचळ, आरती मोदी आणि सूर्याजी भोसले काम पाहत आहेत. केजीएन सरस्वती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत चेसमनच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धा यशस्वितेसाठी मेहनत घेतली. स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी सायंकाळी करण्यात येणार आहे.
