धुळे, भारत निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रातून प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणित करुन घेणे बंधनकारक असल्याचे कळविले आहे. त्यानुसार 02- धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार/राजकीय पक्ष यांनी कार्यवाही करावी, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी कळविले आहे.
जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी म्हटले आहे, मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसपूर्वी प्रिंट माध्यमांतून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये, याबाबत दक्षता घेणेबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहे. त्यानुसार कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती राज्य व जिल्हास्तरावरील माध्यम प्रमाणिकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये.
अफवा पसरविणाऱ्या तसेच आक्षेपार्ह स्वरुपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी व त्याच्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास त्याचा पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होवू शकतो. तसेच अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नाही, त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
तरी धुळे लोकसभा मतदार संघात राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी म्हणजेच 19 व 20 मे, 2024 रोजी कोणतीही राजकीय जाहिरात राज्य व जिल्हास्तरावरील माध्यम प्रमाणिकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणित करुन घ्यावी, पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये याची राजकीय पक्ष, उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी कळविले आहे.
