सोलापूर 30 नोव्हेंबर ( हिं.स) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली पुढील महिन्यापासून १४, १६ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या सामन्यांना सुरुवात होईल. खुल्या गटांच्या स्पर्धांचाही त्यात समावेश आहे. या स्पर्धांसाठी सोलापूर जिल्ह्यातील सहा मैदानांची उपलब्धता पाहिली जात आहे. मैदानांच्या उपलब्धतेनुसार त्या त्या मैदानांवर या स्पर्धांमधील सामने होणार आहेत.डिसेंबरपासून आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यांना सुरुवात होणार आहे.
सोलापूर, सांगली, धाराशिव व सातारा या दक्षिण विभागातील संघांमध्ये सामने रंगणार आहेत. यावर्षी विशेष बदल म्हणजे चारही जिल्ह्यातील खेळाडूंचा एकत्रित स्वतंत्र संघ निवडला जाणार आहे. पाच संघांमध्ये १४ वर्षांखालील स्पर्धा खेळविली जाणार असून त्याची निवड चाचणी पुढील आठवड्यात पार पडेल.निवड समितीचे अध्यक्ष राजेंद्र गोटे, वैभव इराबत्ती, डॉ. महेश ढेंमरे, सत्यजित जाधव, विक्रांत पवार आणि जिल्हा क्रिकेट असोसिशनचे सचिव चंद्रकांत रेंबुर्से हे त्या संघाची निवड करतील. २०-२० सामने, आयपीएलसह इतर सामन्यांमुळे अलिकडे तरुणांचा क्रिकेटकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे निवड चाचणी वेळी नेहमीच १५०हून अधिक खेळाडू येतात. त्यातून १९ जणांची निवड केली जाते. प्रत्यक्षात ११ व तीन राखीव खेळाडू आणि संघ व्यवस्थापक सामन्यांसाठी निवडले जातात. काही अडचणींमुळे एखादा खेळाडू सामने खेळू न शकल्यास इतर पाच राखीवमधील खेळाडूला त्याठिकाणी संधी मिळते.
हिंदुस्थान समाचार
