मुंबई, भाजपने तिकीट कापलेले जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे पाठवला.
उन्मेष पाटील यांच्याबरोबर त्यांचे मित्र व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
लाचार होऊन राजकारण करणं योग्य नाही – उन्मेष पाटील
यावेळी बोलताना मला उमेदवारी मिळालेली नाही म्हणून ही भूमिका घेतलेली नाही. पण राजकारणात काम करताना मान सन्मान नको, पद नको, पण त्याचा स्वाभिमान सांभाळला जात नसेल, अवहेलना केली जात असेल तर लाचार होऊन राजकारण करणं योग्य नाही. भाजपमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली नाही, अवहेलना होत असल्यानं वेगळी भूमिका घेतली असे उन्मेष पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
बदल्याचं राजकारण मनाला वेदना देणारं!
माझी लढाई आत्मसन्मानासाठी आहे. अवहेलना झाल्यामुळे मी वेगळी भूमिका घेतली आहे. मी केलेल्या विकासाची भाजपला किंमत नाही. बदल्याचं राजकारण मनाला वेदना देणारं होतं. ही पदाची, जय-विजयाची लढाई नाही तर ही स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची लढाई आहे. खानदेशाच्या विकासाच्या बाजूने पुढे नेणारी लढाई असल्याचेही ते म्हणाले.
